एक गाव दुधाविना चहा पिणारं... गावात आहे दुधाची दहशत

एक गाव दुधाविना चहा पिणारं. कारण गावात दुधाची दहशत आहे.... औरंगाबादमधलं धानोरा गाव... का आहे या गावात दुधाची दहशत... पाहूयात दुधाच्या दहशतीची ही कहाणी....

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 23, 2017, 10:33 PM IST
 एक गाव दुधाविना चहा पिणारं... गावात आहे दुधाची दहशत  title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : एक गाव दुधाविना चहा पिणारं. कारण गावात दुधाची दहशत आहे.... औरंगाबादमधलं धानोरा गाव... का आहे या गावात दुधाची दहशत... पाहूयात दुधाच्या दहशतीची ही कहाणी....

अंजली काकडे सध्या दुधाविनाच चहा पितायत. दुधाचा चहा प्यायची त्यांना भीती वाटतेय. धानोरा गावातल्या दुधाची भीती वाटणा-या एकट्या अंजली नाहीत. अख्या गावालाच दुधाची आता भीती वाटतेय. दोन दिवसांपूर्वी अंजली काकडे यांच्या गायीचा मृत्यू झाला. या गायीला पिसाळलेला कुत्रा चावला होता. त्यामुळे इन्फेक्शन होऊन गायीचा मृत्यु झाला. पाठोपाठ दुस-या गायीचाही मृत्यू झाला. दुस-या गायीच्या मृत्यूनं ग्रामस्थ घाबरले. कारण याच गायीच्या दुधाचा चहा पिऊन ग्रामस्थांना मळमळ उलट्यांचा त्रास झाला... शंभरहून अधिक लोकांना विषबाधा झाल्याची बातमी हाहा म्हणता पसरली. सर्वांवर उपचार सुरू झाले आणि आता गावात दुध औषधालाही वापरलं जात नाहीये.

धानोरा म्हटलं की दुधासाठी प्रसिद्ध गाव. गावात 3 डेअरी आहेत. रोज हजार लीटरहून अधिक दुध सिल्लोडला जातं. पण दोन दिवसांत हा व्यवसाय पुरता रसातऴाला गेला. 

खरी गोम तर पुढेच आहे... गाय कुत्रा चावल्याने गेली आणि दितं दुध प्यायल्याने आपलाही मृत्यू होईल या भीतीने ग्रामस्थ दवाखान्यात गर्दी करायला लागलेयत. सर्वच जनावरं यामुळं बाधित झालीयत असं ग्रामस्थांना वाटतंय. अखेर पशु वैद्यकीय अधिका-यांनी गावातली झाडून सगळी जनावरं तपासली तेव्हा सा-यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

वैद्यकीय अधिकारी गावात आले. ग्रामस्थांना औषधं दिलं. लोक घरी गेले. त्यानंतर विषबाधा झालीच नव्हती तर भीतीपोटी काहींना मळमळ होत होती आणि त्याचा धसका सगळ्यांनीच घेतला असं वैद्यकीय अधिकारी सांगतायत. 

धानोरा गाव आमदार अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघात येतं. गावात कुत्रे सोडले जातात त्याचा त्रास होतो असं ते म्हणालेयत. यापुढे जर कुत्रे गावात सोडले गेले तर जिल्हाधिका-यांकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. या प्रकारानंतर सत्तार यांनी गावाला भेट दिली आणि न घाबरण्याचां आवाहनही ग्रामस्थांना केलंय. 

गावातल्या प्रत्येकाची प्रकृती आता चांगली आहे. पण दुधाची दहशत मोठ्या प्रमाणात पसरलीय. पण ही दहशत गावातल्या दुधाच्या व्यवसायासाठी चांगली नाही. त्यामुळं ही दहशत जितक्या लवकर जाईल तितकं चांगलं...