विकास भोसले, सातारा : पितृपक्ष पंधरवड्यामुळे सध्या गावोगावी कावळ्यांना भलतीच मागणी आली आहे. पण सातारा जिल्ह्यामधल्या जखिणवाडी गावचं दुखणं वेगळंच आहे. काय आहे या गावाची व्यथा, पाहा हा विशेष वृत्तांत.
ठिकाण : सातारा जिल्ह्यातल्या कऱ्हाड तालुक्यातल्या जखिणवाडीची स्मशानभूमी
वेळ : सकाळी दहा ते अकराची
निमित्त : अंत्यविधी निमित्तानं कावळ्यांकरता ठाव म्हणजेच पान मांडलेलं...
पण दूरवर कावळ्यांचा मागमूसही नाही. या गावात गेल्या पंचवीस वर्षांत एकही ‘ठाव’ कावळ्यानं शिवलेला नसल्याचं गावकरी सांगतात. विशेष म्हणजे, नदीकाठी गर्द झाडीत स्मशानभूमी असूनही नैवेद्य शिवायला कावळा येत नाही.
कावळ्यांची संख्या कमी झाली असं म्हणावं, तर शिवारात कावळे दिसतात. मात्र ते स्मशानभूमीकडे फिरकत का नाहीत, याचं कोडं या गावाला अजूनही उलगडलेलं नाही.