मुंबई : काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना मारहाण प्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांनी स्वत:हून चिपळूण पोलिसांना शरण आलेत. त्यांना अटक करण्यात आलेय. त्यांना ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
राणे यांना उच्च न्यायालयाने २३ मे पर्यंत पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ते आज पोलिसांना शरण आलेत. संदीप सावंत यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी माजी खासदार नीलेश राणे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी चिपळूण पोलीस ठाण्यात हजर झालेत.
मारहाण प्रकरणी त्यांना अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असे सांगत त्यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्जही फेटाळला होता. सावंत यांचे गेल्या २४ एप्रिल रोजी चिपळूण येथील त्यांच्या घरातून अपहरण करून मुंबईला नेऊन मारहाण केल्याचा गुन्हा नीलेश, त्यांचे अंगरक्षक मनिष सिंग, जयकुमार पिलाई, स्वीय सहाय्यक तुषार पांचाळ आणि कुलदीप तथा मामा खानविलकर यांच्याविरूध्द नोंदवण्यात आला होता.
नीलेश राणे आणि त्यांच्या साथीदारांनी केलेल्या हल्ल्यात संदीप सावंत गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. रत्नागिरी येथील मराठा आरक्षण मेळाव्याला अनुपस्थित राहिल्याच्या कारणावरून नीलेश राणे यांनी ही मारहाण केल्याचा आरोप आहे.