पोलिसांचे नागरिकांवर 'तालिबानी छळ'

कायद्याचे रक्षकच कशी दादागिरी आणि दबंगगिरी करतात, याचं धक्कादायक वास्तव आता आम्ही तुम्हाला दाखवतो... 

Updated: Jan 13, 2016, 07:29 PM IST

नालासोपारा : कायद्याचे रक्षकच कशी दादागिरी आणि दबंगगिरी करतात, याचं धक्कादायक वास्तव आता आम्ही तुम्हाला दाखवतो... 

'सद् रक्षणाय खलनिग्रहनाय' या आपल्या ब्रीदवाक्यालाच नालासोपा-याच्या तुळींज पोलिसांनी कलंक लावलाय. सोमवारी रात्री नालासोपा-यात हा अमानुष प्रकार घडलाय... 

रिक्षाचालक विनोद कुमार यादव हा ब्रीजखाली प्रवाशांची वाट पाहत होता. त्यावेळी तुळींज पोलीस ठाण्याचे दोन पोलीस रिक्षा चालकांच्या गाड्यांवर काठीने मारत होते. त्यात यादवच्या रिक्षाची काच फुटली. आता माझ्या मालकाला मी काय उत्तर देऊ, नुकसानभरपाई कोण देणार, अशी विचारणा रिक्षाचालकानं केली. तेव्हा या निर्दयी पोलिसांनी यादवला जबर मारहाण केली. 

पोलीस स्टेशनला नेऊन त्यांनी रिक्षावाल्याला रात्रभर लाथाबुक्क्यांनी आणि कमरेच्या पट्ट्यानं मार मार मारलं. त्यांनी एवढा बेदम चोप दिला की, रिक्षावाल्याच्या डोक्याला दुखापत झाली असून डोळाही सुजलाय. झालेल्या मारहाणीची कुठंही वाच्यता करायची नाही, असंही पोलिसांनी धमकावलं. विनोद आणि त्याच्या वडिलांच्या को-या कागदावर सह्या घेऊन गंभीर गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही पोलिसांनी दिली.