पुणे : पुण्यातल्या तोफखान्यातलं आजचं दृश्यं हेलावून सोडणारं होतं. मुरुडमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर आज मृतदेह पुण्यात आणण्यात आले. शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या राफिया आणि साफिया या जगात आल्या त्याही एकाचवेळी आणि निघूनही गेल्या एकमेकींच्या सोबतीनंच...
त्या दोघी एकत्रच जन्माला आल्या होत्या. जुळ्या बहिणी असल्यानं अगदी एकत्र वाढल्या. शाळा, कॉलेज, खेळ सगळीकडेच एकमेकींची सोबत होती आणि दोघींनी एकत्रच या जगाचा निरोपही घेतला. मुरुड दुर्घटनेमध्ये राफिया आणि साफिया कुरेशी या दोघी जुळ्या बहिणींचा मृत्यू झाला. त्यामुळे अन्सारी कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली होती. पुण्यातल्या तोफखान्यात होती ती प्रचंड स्मशानशांतता.....
राफिया आणि साफिया या दोघीही अबेदा इनामदार कॉलेजच्या बीएससी कॉम्प्युटर सायन्सच्या तिसऱ्या वर्षात शिकत होत्या. याच कॉलेजच्या सहलीला त्या गेल्या आणि काळानं त्यांच्यावर झडप घातली. अभ्यासात हुशार असणाऱ्या अन्सारी बहिणींची कॉलेजमधली वर्तणुकीही चांगली होती.
ऐन उमेदीच्या काळात अनेक स्वप्न दोघा बहिणींनी पाहिली होती... आता त्या सगळ्याचा चुराडा झाला. त्या दोघींची अशी अचानक एक्झिट सगळ्यांनाच चटका लावून गेली.