मुकूल कुलकर्णी, नाशिक : ऐन दिवाळीत तूर डाळीने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडल्यानंतर थंडीच्या मोसमात आता अंडी आणि चिकनचे भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. कुक्कूटपालनासाठी लागणाऱ्या मका आणि सोयाबीनच्या उत्पादनात झालेली घट हे याचं मुख्य कारण असणार आहे.
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्याने अनुभवल्यावर आता शहरी भागालाही दुष्काळाचे परिणाम महागाईच्या रूपाने जाणवायला सुरूवात झालीय. डाळी कडाडल्या, भाज्या महागल्या आता चिकन आणि अंडीही महागण्याची चिन्हं आहेत. कोंबडी खाद्यासाठी आवश्यक मका आणि सोयाबिनचं उत्पादन ३० ते ४० टक्क्यांनी घटलंय. त्यामुळे होलसेल बाजारात ५ रूपयांना मिळणारी विलायती अंडी ७ रूपयांपर्यंत... तर, ८ रूपयाला मिळणारी गावठी अंडी १० रूपयांपर्यंत मिळण्याची शक्यता आहे.
तसंच चिकनच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. १४० रूपयांना मिळणारं ब्रॉयलर चिकन १८० ते २०० रूपयांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे शेजारील राज्यातूनही मका आणि सोयाबीनचं उत्पादन घटल्याचा परिणाम पोल्ट्री व्यवसायावर होतोय,
निसर्गाच्या लहरीपणाचा पोल्ट्री व्यवसायासारख्या शेतीच्या जोडधंद्यांनाही फटका बसतोय. त्यामुळे येत्या काही दिवसांत नॉन व्हेज प्रेमींच्या खिशाला फटका बसण्याची चिन्हं आहेत...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.