एक हृदयद्रावक बातमी... आईच्या ममतेची

 धामणगाव रेल्वे तालुक्यातली प्रिती कुमरे ही तरूणी पोलीस भरतीसाठी आली होती. तिच्यासोबत होती तिची सव्वा वर्षांची मुलगी परी.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 30, 2017, 02:43 PM IST
एक हृदयद्रावक बातमी... आईच्या ममतेची title=

अमरावती : एक हृदयद्रावक बातमी... आईच्या ममतेची... अमरावतीच्या पोलीस मुख्यालय मैदानावर गेल्या शनिवारी पोलीस भरतीदरम्यान हे मन हेलावणारं चित्र दिसलं. धामणगाव रेल्वे तालुक्यातली प्रिती कुमरे ही तरूणी पोलीस भरतीसाठी आली होती. तिच्यासोबत होती तिची सव्वा वर्षांची मुलगी परी... पोलीस मुख्यालयात 100 मीटर धावण्याची चाचणी प्रितीनं यशस्वी केली. 

तिची पुढची चाचणी होती 800 मीटरची.. पण आपल्या हातातल्या लहानग्या परीचं काय करायचं, असा प्रश्न तिला पडला. तिची घालमेल होत होती. सोबत कुणीही नसताना आपल्या मुलीला घेऊन ती भरतीसाठी आली खरी, पण आता बाळाला कुठं ठेवायचं, या चिंतेनं तिला ग्रासलं होती. अशावेळी अमरावतीचे पोलीस आयुक्त पुढं आले. त्यांनी तिच्या परीची काळजी घेण्यासाठी पोलीस कर्मचारी नेमून दिला.

 तेव्हा कुठं प्रिती पुढच्या धावण्याच्या चाचणीसाठी सज्ज झाली. आईला धावताना पाहून परी रडत होती. तर ही माऊली पोटासाठी जीव तोडून धावत होती. धावतानाही तिचं लक्ष घारीसारखं आपल्या पिल्लाकडंच होतं. तिची नजर आपल्या परीकडंच भिरभिरत होती. हे दृश्य पाहून उपस्थित अक्षरशः हेलावून गेले.