नाशिक: नाशिकमध्ये राष्ट्रवादीचं मफलर मनसेच्या गळ्यात पडलंय...... ज्या मफलरवरुन टीकेचा घणाघात करुन मनसेनं नाशिकची सत्ता मिळवली.... आज त्याच राष्ट्रवादीला साथ देत तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादीच्या कमरेला मनसेनंच बांधल्या.... महापौरपदाच्या निवडणुकीची मनसेनं परतफेड केली.
नाशिक महापालिकेच्या आवारात गुलालाची उधळण आता नवी राहिलेली नाही. दरवर्षी अशाच प्रकारे गुलाल उधळला जातो. बदलतात फक्त गुलालाची उधळण करणारे कार्यकर्ते आणि त्यात न्हाहून निघणारे नेते..... स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं गेली दोन वर्षं ही संधी मनसेला मिळाली, यंदा मात्र तो मान राष्ट्रवादी काँग्रेसचा होता.... राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिवाजी चुंबळे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली.
१६ सदस्यांच्या सभागृहात चुंबळेच्या बाजूने ११ तर विरोध दाखविण्यासाठी उभ्या असणाऱ्या शिवसेना आरपीआय भाजप युतीच्या ललिता भालेराव यांना ५ मतं मिळाली. राष्ट्रवादीच्या चुंबळे यांना राष्ट्रवादीसह , काँग्रेस आणि मनसे साथ मिळाल्यानं नवीन आघाडीच्या सत्तेचा नवा ‘राज’मार्ग नाशिक महापालिकेत तयार झालाय.
ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीकेचा घणाघात करुन मनसेनं नाशकात बस्तान बसवलं, त्याच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दबावामुळे मनसेनं आपला उमेदवारही उभा केला नाही आणि ऐन कुंभमेळाच्या तोंडावर महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याच हातून राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवल्या. सत्ताप्राप्तीसाठी झालेल्या या नव्या आघाडीचा विजय झाला असला तरी विजयी गटात राहूनही मनसेचा एक प्रकारे झालेला हा पराभवच.
शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर स्वबळावर राजकारण करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपली वेगळी भूमिका घेऊन राजकारणाच्या आखाड्यात उतरत असल्याचं जाहीर केलं होतं. इतर प्रस्थापित राजकीय पक्षापेक्षा आपला पक्ष कसा वेगळा आहे, हे दाखवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात होता. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. सगळे राजकीय पक्ष एकाच माळेचे मणी...
स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसन मनसेला पाठिंब्यासाठी झुकविलं की महापौर पदाच्या निवडणुकीची परतफेड म्हणून दिलदारपणे मनसे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठीशी उभी राहिली, याचे पाहिजे ते सोयीस्कर अर्थ दोन्ही पक्ष काढतील मात्र तडजोडीच्या राजकारणात मनसे इतर पक्षा पेक्षा कमी नाही यावर शिक्कामोर्तब झालाय. हेच दिसून येतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.