नाशिक: नाशिक महापालिकेत आज सत्ताधारी मनसेवरच आंदोलन करण्याची वेळ आली. तर विरोधकांनीही लगेचच ही मनसेची नौटंकी असल्याचं म्हणत खिल्ली उडवली. पण या सगळ्या गदारोळात महापालिकेचं आजचं काम रखडलं..
नाशिक महापालिकेतली कामं होत नसल्यानं सत्तधारी मनसेवरच आंदोलन करण्याची वेळ आलीय. महापालिकेत मनसेची सत्ता असल्यानं राज्य सरकार मनसेची कोंडी करतंय, असा ‘राज साहेबांच्या’ शिलेदारांचा आरोप आहे. कुंभमेळा तोंडावर आहे, अशा परिस्थितीत महापालिकेत गेल्या चार महिन्यापासून पूर्ण वेळ आयुक्त नाहीत, जे आयुक्त आहेत ते महत्वाच्या विषयांच्या फाईल मंजूर करत नसल्यानं काम रखडल्याचा आरोप होतोय.
मनसेच्या या आंदोलनावर टीका करण्याची संधी विरोधकांनी सोडली नाही. चार महिने आयुक्त नाहीत पण उरलेली दोन वर्ष आयुक्त होते त्या काळात मससेनं काय दिवे लावले, असा त्याचा सवाल आहे. मनसेनं ही नौटंकी बंद करावी, असा खोचक सल्लाही विरोधरांनी दिलाय.
मनसेच्या या आंदोलनामुळे स्थायी समिती सभापतींनी आयोजित केलेला शाही मार्ग पाहाणी दौराही रद्द करावा लागला. लोकमान्य टिळकांच्या जयंतीचा कार्यक्रमही लांबणीवर पडला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.