धुळे : धुळ्याचे भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा एकदा माजी उपमुख्यमंत्री आणि सध्या भ्रष्टाचार प्रकरणी अटकेत असलेले, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. छगन भुजबळ यांना आमदार अनिल गोटे यांनी एक पत्र लिहिलं आहे, त्याच्यात हे आरोप करण्यात आले आहेत.
पुतण्याला अडकवून पंकजला सोडवून घेतले. खुदा के घर मे देर है, अंधेर नाही, असेही माझी झालेली सामाजिक अवहेलना, मानहानी, काही दोष नसतांना भोगावा लागलेला तुरूंगवास, याची किंमत परमेश्वर तुमच्याकडून पुरेपुर वसुल करेल, आमदार गोटे यांनी म्हटले आहे.
तेलगी प्रकरणात आम्हाला आपण अंडासेलमधे ठेवले होते. आता आपलाही अंडासेलशी परिचय झाला असेल. पुतण्याला अडकवून आपण पंकजला सोडवून घेतले आहे, मात्र आम्हाला भोगावा लागलेल्या तुरूंगवासाची किंमत परमेश्वर आपल्याकडून वसुल केल्याशिवाय राहणार नाही.
८६८ कोटी रूपयाची मालमत्ता कोठून, आली याचा आपण आणि समीर भुजबळ यांनी तपशील दिल्यामुळे अटक करण्यात आली.
स्वर्गीय बाळासाहेब आणि माँसाहेब कै. मिनाताई ठाकरे यांनी आपणावर पुत्रवत प्रेम करूनही आपण शिवसेनेकडे पाठ फिरविली. शिवसेनेचा त्याग केल्यानंतर शरद पवारांना गॉडफादर केले.
तेलगी प्रकरणात आपण सभागृहात माझा नामोल्लेख केला. त्यावेळी उभे राहून सभागृहातच सांगितले की, माझ्या घराचा पत्ता तेलगीने दिला हे सत्य आहे. तेलगी आणि माझ्या संबंधातील वस्तुस्थिती स्वीकारायला मी डगमगलो नाही. ४ वर्षे तुरूंगात असतांना सुध्दा मोक्का आणि उच्च न्यायालयासमोरही सांगितले.
उलटपक्षी तुमच्या ठिकठिकाणच्या बंगल्यामधे अनेक कार्यालयात, फॉर्महाऊसवर झालेल्या झडतीत तर हजारो कोटी रूपयांची संपत्ती सापडली. तेलगी प्रकरणातून तुम्ही शरद पवारांच्या कृपा छत्रामुळेच सुटलात.
तुम्ही शिवसेनेत असताना बाळासाहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री केले असते, तर काय स्थिती झाली असती महाराष्ट्राची? तेलगी प्रकरणातील आम्हा सर्वांना अंडासेलमधे ठेवले होते. आपलाही अंडासेलशी परिचय झाला असेलच.
२९ जून २००३ ला मला चौकशीला बोलाविले. पांघरूण आणि कपड्याच्या दोन बॅगा भरून, विशेष चौकशी पथकाच्या कार्यालयात हजर झालो. ऑक्टोबर २००२ मध्ये मी आणि माझा मुलगा तेजस आम्ही स्वत:हून एस.आय.टी समोर गेलो.
माझ्याविरूध्द सबळ पुरावा मिळत नसल्यामुळेच तुम्ही जयस्वाल वाकडे जोडीवर मला अडकविण्याची जबाबदारी सोपविली. तेजसच्या एकूण ३६ वेळा सह्या घेतल्या. त्यातील एकही स्टॅम्पपेपरवरील सहीशी जुळत नसल्याचा अहवाल हस्ताक्षर तज्ञांनी दिला.
अधिकार्यांनी माझ्या घराची सलग १३ तास झडती घेतली. पोलीस अधिकार्यांनी सार्वजनिक कामाच्या माझ्या ११ फाईली उचलून आणल्या. आजतागायत जप्त केलेल्या फाईलीमधील एकही कागद न्यायालयासमोर आणला नाही.