बुलडाणा : जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील बदनापूरमध्ये तीन दिवसांपासून बेपत्ता महिलेचा मृतदेह 10 महिन्याच्या चिमुरडीच्या मृतदेहासह विहीरीत आढळला. संगीता गाडे असं मृत महिलेचं नाव आहे.
पाच वर्षांपूर्वी रवींद्र गाडे यांच्याशी तिचा विवाह झाला होता. सुरुवातीचे काही दिवस दोघांचा संसार नीट सुरु होता. मात्र पहिली मुलगी झाल्यानंतर वंशाच्या दिव्यासाठी सासरच्या मंडळींकडून संगीताचा छळ करण्यात येत असे असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यातच दुसरी मुलगीच झाल्याने सासरच्या मंडळींनी संगीताला चटके देणे, घराबाहेर काढणे अशाप्रकारचे अत्याचार केल्याचा आरोपही त्यांनी केला.
तीन दिवसांपूर्वी संगीता 10 महिन्याच्या मुलीसह घर सोडून गेल्याची तक्रार सासरच्या मंडळींनी पोलिसांत केली होती. मात्र, त्याच दरम्यान तिचा मुलीसह मृतदेह विहीरीत आढळल्याने ही हत्या की आत्महत्या याचं गूढ वाढले आहे. सासरच्या मंडळींनीच तिची हत्या करुन मृतदेह विहीरीत फेकल्याचा आरोप संगीताच्या माहेरच्यानी केला आहे.