चंद्रपूर : नागभीड शहरापासून ५ किमी अंतरावर जंगलात एका वाघाचा मृतदेह आढळलाय. हा मृतदेह काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या श्रीनिवासनचा असल्याचं समजतंय.
म्हसली या गावातील शेत शिवारात पिकांचे रक्षण करण्यासाठी महादेव इरपाते या शेतकऱ्यानं कुंपणात वीजप्रवाह सोडला होता. या वीजप्रवाहाचा तीव्र धक्का लागून श्रीनिवासन वाघाचा मृत्यु झाला.
त्यामुळे, घाबरलेल्या शेतकऱ्यानं श्रीनिवासनच्या गळ्यातील कॉलर आयडी फेकून देत मृत वाघाला आपल्या शिवारात पुरलं होतं, अशी माहिती वनाधिकाऱ्यांनी दिलीय. वन्यजीव तज्ज्ञांनी घटनास्थळी दाखल होत हा मृतदेह ताब्यात घेतलाय.
अजूनही बेपत्ता असलेल्या 'जय' वाघाचा श्रीनिवासन हा बछडा होता. नागपूर जिल्ह्यातल्या पवनी जंगलात श्रीनिवासनचा जन्म झाला होता. तो नागभीड जंगलात राहायचा. १७ एप्रिलपासून त्याच्या कॉलर आयडीपासून मिळणारे सिग्नल एकाच ठिकाणाहून येत असल्यामुळे १९ एप्रिलला त्याचा शोध घेण्यात आला. श्रीनिवासनचा कॉलर आयडी जंगलात तुटलेल्या अवस्थेत मिळाला. मागच्या वर्षी श्रीनिवासनच्या हालचाली टिपण्यासाठी त्याला कॉलर आयडी लावण्यात आला होता. त्याचा माग काढता काढता अधिकाऱ्यांनी या घटनेचा छडा लावलाय.