नाशिक : मनपा निवडणुकीचे बिगूल वाजायला लागल्यावर हवशे नवशे गवशे या साऱ्यांनीच गर्दी केलीय. या गर्दीत नाशिकच्या सीताबाई मोरे या आकर्षणाचं केंद्र राहील्या आहेत. झणझणीत मिसळीसाठी प्रसिद्ध असलेल्या 85 वर्षांच्या आजीबाई भाजपकडून निवडणूक लढायला इच्छूक आहेत.
गेल्या 60 ते 65 वर्षांपासून नाशिककर सीताबाईंच्या हातची झणझणीत मिसळ खात आलेत, पण आता नाशिककरांनो सीताबाई नव्या इनिंगसाठी सिद्ध झाल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी आजीबाई भाजप कार्यालयात जाऊन मुलाखतही देऊन आल्या. पक्ष तिकीट देईल तेव्हा देईल, आजींनी प्रचाराला सुरूवातही केलीय. घरोघरी जाऊन आजी मतदारांच्या गाठीभेटी देत आहेत.
मुलाखतीत आजीबाई तुम्हाला प्रश्न काय विचारला असं त्यांना विचारलं असता आजीचं उत्तर मजेशीर होतं. मुलाखत घेणारे हे सगळे माझ्यासमोर लहानाचे मोठे झालेत. ते मला काय विचारणार ? फक्त आजी मस्त मिसळ खाऊ झाला एवढंच ते म्हणाल्याचं आजी सांगतात.
नाशिकच्या बहूचर्चित प्रभाग क्रमांक 15 मधून आजी नशीब आजमावणार आहेत. निवडणुकीसाठी कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. जनाबाई, छबूताई, लताबाई, ताराबाई, चित्राताई या कोअर कमिटीच्या सदस्यांच्या माध्यमातून जोरदार प्लॅनिंग सुरू आहे.
भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी हे सगळेच पक्ष सध्या युती आघाडीच्या वादात अडकलेत, त्यामुळे तिकीट मिळेल की नाही यासाठी नाशिकमध्ये अनेक इच्छूक देव पाण्यात घालून बसलेत. असं असलं तरी मिसळवाल्या सीताबाई आजींचा उत्साह मात्र तरूणांना लाजवेल असाच आहे.