कल्याण : येथे एका लखपती भिकार्याच्या झोपडीला आग लागली. या आगीत तीन पोत्यात भरुन ठेवलेले पैसे जळून खाक झालेत.
मोहने येथे भिकार्याच्या झोपडीला आग लागली. त्याच्याकडे तीन पोती नोटा होत्या. भिकार्याकडे इतका पैसा आला कुठून याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये मात्र चर्चेचा विषय ठरला आहे. तीन पोत्यात किमान १० लाख रुपयांची रक्कम असावी अशी शंका आहे.
मोहने परिसरातील लहूजी नगर झोपडपट्टीत मोहम्मद रहेमान आणि त्याची पत्नी फातिमा हे वृद्ध जोडपे राहते. हे दांपत्य परिसरात भीक मागून उदरनिर्वाह चालवतात. मंगळवारी रात्री वीज गेल्यामुळे त्यांनी झोपडीत पणती पेटवली होती. रात्री पणती पेटती ठेवून ते झोपी गेले. रात्री उशिरा ही पणती कलंडून झोपडीने पेट घेतला, अशी प्राथमिक माहिती आहे.
आग लागल्याचे लक्षात येताच मोहम्मद आणि फातिमा आरडाओरड करत घराबाहेर पळाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. दरम्यान, तुमच्याकडे किती पैसे होते, असे विचारले असता रेल्वे, बस स्थानक परिसरात आम्ही भीक मागतो. मिळालेले पैसे पोत्यात भरून ठेवतो. भीक मागूनच खातो मग पैसे कशाला लागतात, असा सवाल त्यांनीच उपस्थित केला.