मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस होत असला तरी अनेकांना प्रतिक्षा आहे ती मान्सून महाराष्ट्रात लवकर दाखल होण्याची. मान्सूनच्या आगमनाची वेळ आता जवळ आली आहे. मान्सूनचं केरळमध्ये आगमन झालं आहे. हवामान विभागाने याची अधिकृत माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यात येत्या १-२ दिवसात पावसाची शक्यता आहे.
राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे. २४ तासात सलग अडीच मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यास तेथे मान्सून दाखल झाला असं जाहीर केलं जाते. परावर्तित होणारे दीर्घ सूर्यकिरण आणि मोसमी वाऱ्यांचा प्रवाह यांचा अभ्यास केल्यानंतर मान्सून जाहीर केला जातो.
दरवर्षी मान्सून श्रीलंकेमार्गे एक जून रोजी केरळ किनारपट्टीवर दाखल होतो. यंदा मात्र दोन आठवड्यांपूर्वी निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासात विघ्न आला. त्यामुळे भारतीय हवामानशास्त्र विभाग आयएमडीने यंदा मान्सून ७ जून रोजी केरळमध्ये दाखल होईल अशी शक्यता वर्तवली होती. मान्सून केरळ किनारपट्टीवर मान्सून आता दाखल झाला आहे.
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल अनुकूल परिस्थितीवर अवलंबून असते. केरळनंतर मान्सून कर्नाटकमार्गे महाराष्ट्रात दाखल होतो. त्यामुळे येत्या २ दिवसात राज्यात मान्सून दाखल होण्याची बळीराजासह सगळेच आतूरतेने वाट पाहत आहेत.