पुणे : माळीण गावात झालेल्या भुस्खलन आपत्तीत मृतांचा आकडा वाढतच आहे. आतापर्यंत 82 मृतदेह चिखलातून बाहेर काढण्यात आले आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. जवळपास १०० लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली असण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, वाड्या-वस्त्यांचेही पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
डोंगर दरडीची माती उपसण्याचे काम एनडीआरचे ३०० जवान करीत आहेत. आंबेगाव तालुक्यातील माळीण गावातील घटनेला ६० तास झालेत. तरीही अजून अनेक लोकांचा थांगपत्ता लागलेला नाही. मातीच्या ढिगाऱ्याखाली ४४ घरे गाडली गेल्याचे सांगण्यात येत आहे. जवळपास १६० लोक कोसळलेल्या दरडीखाली असण्याची शक्यता आहे.
डोंगराच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ४४ घरांबरोबरच माळीण येथील अन्य वाड्या-वस्त्यांचेही पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती राज्याचे पुनर्वसन व मदतकार्य मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी शुक्रवारी दिली.
मदतकार्याबाबत आढावा बैठक डॉ. कदम यांनी घेतली. बैठकीला आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. माळीण गावातील सात वाड्या व वस्त्या मिळून १७४ घरे आहेत. त्यातील ४४ घरे डोंगराखाली दबली गेली आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.