UPDATE माळीण गाव : मृतांचा आकडा 60 वर, राज्यसरकारकडून मदत जाहीर

गावातलं मदतकार्य केवळ  45 टक्केच पूर्ण झालंय. त्यामुळं अडकलेल्यांना  बाहेर काढण्यासाठी अजून 48 तास लागणार असल्याची माहिती एनडीआरएफचे कमांडर  आलोक अवस्थी यांनी दिलीय. ढिगा-याखाली अडकलेले मृतदेह आता कुजू लागले आहेत. त्यामुळं एनडीआरएफसमोरचे आव्हान अधिकच बिकट होत चाललंय. 

Updated: Aug 1, 2014, 09:17 PM IST
UPDATE  माळीण गाव : मृतांचा आकडा 60 वर, राज्यसरकारकडून मदत जाहीर title=

माळीण : माळीण गावातलं बचाव आणि मदतकार्य पूर्ण झाल्यानंतर वाचलेल्या गावकऱ्यांशी चर्चा करून त्यांचं अन्यत्र पुनर्वसन केलं जाईल, अशी घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी केलीये.

याखेरीज धोकादायक परिस्थितीत असलेल्या राज्यातल्या अन्य गावांच्या पुनर्वसनासाठीही सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

गावातलं मदतकार्य केवळ  45 टक्केच पूर्ण झालंय. त्यामुळं अडकलेल्यांना  बाहेर काढण्यासाठी अजून 48 तास लागणार असल्याची माहिती एनडीआरएफचे कमांडर  आलोक अवस्थी यांनी दिलीय. ढिगा-याखाली अडकलेले मृतदेह आता कुजू लागले आहेत. त्यामुळं एनडीआरएफसमोरचे आव्हान अधिकच बिकट होत चाललंय. 

माळीण गावात दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची  मदत जाहीर करण्यात आलीय तर जखमींचा सर्व खर्चही राज्य सरकार उचलणार आहे. दुर्घटना घडून आता 54 तास उलटलेत. मृतांचा आकडा वाढतच चाललाय. मृतांचा आकडा आता 57 वर गेलाय. 

मृतांमध्ये 25 महिला, 21 पुरुष आणि 7  लहान मुलांचा समावेश आहे. तर 8 जणांना वाचवण्यात यश आलंय.  एनडीआरएफकडून ढिगा-याखाली अडकलेल्यांचा अजूनही कसून शोध घेतला जातोय.  गाळ उपसण्याचं काम सुरूय..मात्र माळीण गावात आत्ता पाऊस सुरूय. तसंच  परिसरात दुर्गंधी पसरलीय...दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या पार्थिवांवर माळीण  गावातल्यात स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येताहेत.

एसटी ड्रायव्हरने दिली सर्वप्रथम घटनेची माहिती

माळीण दुर्घटनेबाबत ज्या एसटी ड्रायव्हरने सर्वप्रथम घटनेची माहिती दिली तो ड्रायव्हर  आज तीन दिवसांनंतर सुखरूप बाहेर परतला. प्रताप काळे हा एसटी ड्रायव्हर आसाणे-  मंचर एसटी बस घेऊन मंचरला जात असताना ही घटना त्यांच्या लक्षात आली.  त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे यांनी. 

03:03PM

मुंबईतील डबेवाले देणार माळीण गावाला मदतीचा हात. अंधेरीतील डबेवाला गोविंदा पथक देणार आर्थिक मदत.

02:23PM 

माळीण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारतर्फे ५ लाख रुपयांची मदत जाहीर. तसेच जखमींचा सर्व खर्च राज्य सरकार करणार.

12:34 PM  

माळीणमध्ये ४८ तासानंतरही बचाव कार्य सुरुच. आत्तापर्यंत ६० मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर आठ जखमींची सुखरुप सुटका - आयजी संदीप राठोड, एनडीआरएफ

12.11 PM

माळीण दुर्घटना : चर्चा हवी असेल तर पुरवणी मागणी करा - लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन

12.11 PM

माळीण दुर्घटना : लोकसभा अध्यक्षकांनी विरोधकांची चर्चेची मागणी  फेटाळली, सिंग यांनी व्यवस्थीत माहिती दिलेय - सुमित्रा महाजन

12.11 PM

माळीण दुर्घटना : सिंग यांच्या निवेदनावर विरोधकांची चर्चेची मागणी

12.10 PM

माळीण दुर्घटनेबाबात लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांचे निवेदन

11.45 AM

100 पेक्षा जास्त लोक अडकल्याची भीती

11.40AM

माळीण - मृतांची संख्या 53, महिला 25, पुरुष -21, लहान मुले- 8, 

08.30AM

माळीण येथे दुर्गंधीचा त्रास, चिखल उपसण्याचे काम सुरुच

08.15 AM

माळीण येथे पावसाची रिझीम सुरुच, मदतकार्यात अथळा

07.15 AM

माळीण गाव : मृतांचा आकडा 49 वर

7.00AM

माळीण गावातलं मदतकार्य संपण्यापूर्वीच या दुर्घटनेवरून राजकारण सुरू झालंय. केंद्र सरकारनं तातडीनं मदत केली मात्र राज्य सरकार या घटनेबाबत गंभीर नसल्याचा आरोप शिरूरचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलाय. राज्य सरकारच्या डोंगर सपाटीकरणाच्या योजनेमुळंच ही दुर्घटना घडल्याचा आरोप त्यांनी केलाय.

पुणे : माळीण गावातल्या मृतांचा आकडा 49 वर पोहोचलाय. या दुर्घटनेतल्या 18 मृतदेहांवर आज अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  

निसर्गाचा रुद्रावतार आणि कोप इतका विचित्र की... डोंगर कोसळून अख्खं गाव बेचिराख झालं... पण, स्मशानभूमी मात्र शिल्लक राहिली..... आणि त्याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पण, या स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या वेळी रडण्यासाठी मृतांच्या घरातलं कुणी शिल्लक राहिलेलं नव्हतं. गावातील वाचलेले व्यक्तीही यावर बोलायला तयार नाहीयत. 

ग्रामस्थांना निरोप देण्यासाठी आजूबाजूच्या गावातल्या गावकऱ्यांनीही गर्दी केली होती... अंत्यसंस्कार सुरू होते त्यावेळी आवाज होत होता तो फक्त हुंदक्यांचा... 

या निसर्गाच्या कोपानं गावाची ओळख तर मिटवलीच... पण ग्रामस्थांची ओळखही पुसून टाकली... मृतदेह ओळख पटवण्याच्या पलीकडे गेले होते... मृतदेहांवरच्या वस्तूंनी त्यांची ओळख पटवण्यात आली... तर 8 जणांना ढिगाऱ्या खालून वाचविण्यात आलंय.

अनेक परिवार मातीत दबले गेले आहेत. यामुळे काही घरात आपले गेले म्हणून रडण्यासाठीही कुणी नाहीय.

डॉग स्क्वॉड घेतंय मृतदेहांचा शोध...
माळीण गावात मृतांचा आकडा 31 वर गेलाय. अजूनही शेकडो जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यांना शोधण्यासाठी कसून प्रयत्न सुरू आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना शोधण्यासाठी एनडीआरएफने डॉग स्क्वॉड तैनात केलंय. मृतदेहांचा शोध प्रशिक्षित कुत्र्यांच्या मदतीने घेतला जात आहे. आत्तापर्यंत 8 जणांना वाचवण्यात आलंय. त्यापैकी 5 जणांचा शोध या प्रशिक्षित कुत्र्यांनी लावलाय. त्यामुळे हे स्क्वॉड आधी आणलं असतं तर अजून काही जणांना जीवंत बाहेर काढता आलं असतं असंही बोललं जातंय. 

आपत्ती प्रतिसाद दल स्थापन करणार
माळीणमध्ये अख्खं गावच्या गाव डोंगराखाली गाडलं गेल्याच्या दुर्घटनेने अख्खा देश हादरून गेलाय... केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दुर्घटनास्थळी भेट दिली. तर या दुर्घटनेनंतर आपत्ती प्रतिसाद दल स्थापन करण्याची सुबुद्धी महाराष्ट्र सरकारला सुचलीय...

भयंकर दुर्घटनेचंही राजकारण?
माळीण गावातलं मदतकार्य संपण्यापूर्वीच या दुर्घटनेवरून राजकारण सुरू झालंय. केंद्र सरकारनं तातडीनं मदत केली मात्र राज्य सरकार या घटनेबाबत गंभीर नसल्याचा आरोप शिरूरचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलाय. राज्य सरकारच्या डोंगर सपाटीकरणाच्या योजनेमुळंच ही दुर्घटना घडल्याचा आरोप त्यांनी केलाय.  

अख्खं गाव डोंगरानं गिळलं... (UPDATE 03.26 PM)
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माळीण गावाला भेट दिली आहे. माळीण गावासारखी अशी किती गावे, राज्यात धोकायदायक डोंगर दऱ्यांच्या कुशीत आहेत, ते पाहून सुरक्षित ठिकाणी अशी सर्व गावं स्थलांतरीत करण्याची गरज आहे, यावर राज्य सरकारने धोरण ठरवण्याची गरज असल्याचं यावेळी शरद पवारांनी म्हटलंय. 

03.20 PM
आतापर्यंत 30 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 8 जण जखमी असल्याची माहिती पुर्नवसन मंत्री पतंगराव कदम यांनी दिली आहे. बचाव कार्य आणखी दोन दिवस चालेल, यानंतर पुण्यात मिटिंग घेऊन पुर्नवसनाच्या कामाला सुरूवात करण्यात येईल, अशी माहिती पतंगराव कदम यांनी दिली आहे.  

3.00 PM
पुण्याच्या माळीण गावात झालेल्या दुर्घटनेनंतर, महाराष्ट्र सरकारने एनडीआरएफच्या धर्तीवर एसडीआरफी म्हणजेच state Disaster Response Force बनवण्याचा निर्णय घेतला आहे. फोर्सच्या स्थापनेत सुरूवातीला 400 लोकांचा समावेश असेल. राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्याचे पुर्नवसन मंत्री पतंगराव कदम यांनी ही घोषणा केली आहे. 

2.35 pm
लोकससभेत माळण गावातील दुर्घटनेबाबत शोकप्रस्ताव

2.30 pm
मुंबईतील सिद्धीविनायक ट्रस्टकडून माळण गावाला ५० लाख रुपयांची आर्थिक मदत

2.00 pm
माळीण गावातील मृतांच्या नातेवाईकांना केंद्रान २ लाखांची मदत केली जाहीर 

11.30 am
माळीण गावातील दुर्घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दु:ख व्यक्त केलं

11.00 am
माळीण गावात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून पाहाणी

10.30 am
माळीण गावात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग दाखल झालेत

10.00 am
पुन्हा डोंगर कोसळण्याच्या भितीने अनेक ग्रामस्थांनी घराला टाळे टोकून केले स्थलांतर

9.45 am
माळीण : मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळा, काम थांबविले
१० गावांना स्थलांतरीत करण्याचा निर्णय
पुन्हा डोंगरकडा कोसळण्याची भीती

मृतांची नावे
१. रखमाबाई सखाराम झांजरे (३५)
२. विठ्ठल भीमा हौसाबाई झांजरे
३. संजय कामाजी पोटे (३०)
४. मारुती दगडू गाडेकर
५. मोतीराम हरिभाऊ शिंगाडे (२५)
६. दामू धोंडू पोटे (४२)
७. गोरडे
८. बाळू (३)

माळीण गाव : २२ मृतदेह हाती, ८ जणांना जिवंत काढण्यात यश
माळीण : पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या माळीण गावावर काळानं निर्दयी झडप घातली. मुसळधार पावसामुळं डोंगरकडा कोसळून माळीण गावातली ४४ घरं गाडली गेली. या दुर्घटनेत आतापर्यंत २२ जणांचे बळी गेलेत. आतापर्यंत ८ जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले. शिवाय सुमारे १५० गावकरी ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज घटनास्थळाला भेट देणार आहेत.

अतिदुर्गम भागात डोंगराच्या कुशीत वसलेले ७५० लोकसंख्ये माळीण हे गाव बुधवारी निसर्गाच्या प्रकोपामुळे अक्षरशः उद्‌ध्वस्त झाले.  ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांमध्ये सुमारे ५० मुले आहेत. सततच्या पावसामुळे आणि चिखलामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण झाले. सायंकाळपर्यंत २२ मृतदेह काढण्यात यश आले.

माळीण हे गाव मंचरपासून ५० तर पुण्यापासून १२५ किलोमीटर अंतरावर आहे. या गावच्या सात वाड्या व गावठाण मिळून ७५० लोकवस्ती आहे. गेले दोन दिवस या भागाला पावसाने झोडपून काढले. तब्बल २०० मिलिमीटर पाऊस झाल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले होते.  

पावसाच्या संततधारमुळे बुधवारी सकाळी सात-साडेसात वाजण्याच्या सुमारास अख्खा डोंगर कोसळला. काही समजण्याच्या आधीच माती, मोठमोठे दगड आणि चिखलाच्या गाळात ४८ घरे गाडली गेली. जवळील तलावात डोंगरावरील दगड आणि माती वाहून आल्यामुळे संपूर्ण गावात चिखलाचे ढीग साचले.  

ते असे वाचलेत
आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सावळेराम पुनाजी लेंभे त्यांची मुलगी सविताला नर्सिंगच्या ट्रेनिंगसाठी पुण्याला जाण्यासाठी माळीण फाट्यावर घेऊन गेले. तिला सकाळी सात वाजता एसटीत बसविल्यानंतर पुन्हा घरी आले. पत्नी विठाबाईला घेऊन शेतातील परिस्थिती पाहण्यासाठी गावापासून शंभर मीटर अंतरावर गेले. स्फोटासारखा आवाज ऐकून माघारी पाहिले, तर त्या वेळी मातीचा मोठा ढिगारा दिसला. स्वतःचे व इतरांची घरे दिसेनाशी झाली होती, असे ते सांगतात.

एका क्षणात सामसूम
ग्रामस्थ सावळेराम पुनाजी लेंभे म्हणाले, गावात एकूण ६७ घरे होती. त्यापैकी फक्त सहा घरे आणि शाळा इमारत वाचली आहे. येथील मारुती मंदिरही उद्‌ध्वस्त झाले आहे. शाळा सुरू असती तर अनेक मुले वाचली असती. मात्र, शाळा सकाळी दहाच्या सुमारास सुरू होते. त्यामुळे मुले घरातच होती. ढिगाऱ्याखालून त्यांचा आक्रोशही आम्हाला ऐकू आला नाही. काय होते आणि कसे झाले, हेच कळत नाही. हीच मुले काल शाळेसमोर बागडताना दिसत होती, आता ती दिसणार नसल्याची शोकांतिका मांडली. 

कशी मिळाली माहिती?
गावात सकाळी सात वाजता एस. टी. येते. सकाळी एसटीसाठी म्हणावी तशी गर्दी नव्हती. एस.टी. चालकाला नेहमीची घरे न दिसली नाहीत. दूरवर चिखल माती दिसून आली. त्यानंतर येथे काहीतरी अघटीत घडल्याचे एस टी चालकाच्या लक्षात आल्याने या दुर्घघटनेचा उलगडा झाला. चालकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून सकाळी नऊच्या सुमारास मदतकार्याला सुरुवात झाली.जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासह वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या दोन तुकड्या घटनास्थळी पोहचल्या. प्रत्यक्ष मतदकार्याला सुरुवात झाली. 

पोकलॅंड, जेसीबी यंत्रांच्या साहाय्याने ढिगारा हटविण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु झालेत. मंचर येथे नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आल्यानंतर मदतकार्याला वेग आला. या घटनास्थळाला  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार भेट देऊन पाहाणी केली. आणि प्रशासनाला सूचना दिल्यात. दरम्यान, पाऊस आणि चिखलाच्या ढिगांमुळे मदतकार्यात अडथळे येत होते. आतापर्यंत २२ मृतदेह बाहेर काढण्यात यश आलेय. तर जखमींवर मंचर येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदीचे ट्विट 
पुणे जिल्ह्यात भूस्खलनामुळे अनेकांना जीव गमवावा लागला, हे दु:खद आहे. मी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याशी बोललो असून, परिस्थितीची पाहणी करण्यासाठी ते पुण्याला जातील. 

शरद पवार देणार भेट
पुण्यात डोंगरांच्या कुशीत वसलेली अनेक गावे आहेत. या गावांचा गांभीर्याने विचार करावा लागेल. पवार हे आज गावाला भेट देणार आहे. 

हेल्पलाइन 
बचावकार्य आणि मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. हेल्पलाइन - 020-26120720

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.