उस्मानाबाद : समृद्ध जीवनचा मालक महेश मोतेवार याच्या बाऊन्सर्स आणि ड्रायव्हरनं 'झी मीडिया'च्या प्रतिनिधीला धक्काबुक्की केल्याची घटना घडलीय. उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात हा प्रकार घडलाय.
समृद्ध जीवन घोटाळा प्रकरणी मोतेवार पोलीस कोठडीत आहे. काल रात्री त्याला छातीत दुखायला लागल्यामुळे उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी त्याला सोलापूरच्या रुग्णालयात हलवण्यात येत होतं.
या हालचालींचं वार्तांकन करायला गेलेले 'झी २४ तास'चे प्रतिनिधी महेश पोतदार यांच्याशी मोतेवारच्या कुटुंबीयांनी आरेरावी केली. शानूर काझी नावाच्या ड्रायव्हरनं धक्काबुक्की केली. कॅमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
या प्रकरणात लक्ष घालण्याचं आश्वासन अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी दिलंय. घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या मोतेवारचा ड्रायव्हर आणि बाऊंसर त्याच्यासोबत काय करत होता, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. मोतेवार स्वतः एका मीडिया हाऊसचा मालकही आहेत. असं असताना एका घटनेचं वार्तांकन करायला गेलेल्या पत्रकारांना का अडवण्यात येतंय? असाही प्रश्न आहे.