www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाचा ‘सुकन्या’ योजनेचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आलाय. दारिद्र्यरेषेखाली जन्मलेल्या मुलीच्या जन्मानंतर या योजनेंतर्गत तिच्या नावावर राज्य सरकारतर्फे लगेचच २१,२०० रुपये जमा होणार आहेत.
दारिद्र्यरेषेखालील मुलींना मदत देण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने क्रांतिज्योती सावित्रीबाई सुकन्या योजना आखली आहे.
सुकन्या योजनेचे लाभ...
मुलीचा जन्म झाल्यानंतर तिच्या नावे २१,००० रुपये या योजनेच्या माध्यमातून आयुर्विमा महामंडळाच्यावतीने थेट खात्यात जमा केले जाणार आहेत.
मुलीच्या नावावर आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत रक्कम जमा केल्यानंतर मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर तिला १ लाख रुपये मिळतील.
दरवर्षी १00 रुपये हप्ता जमा करून मुलीच्या पालकांचा विमा उतरविला जाणार आहे. या मुलीच्या पालकांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास जनश्री विमा योजनेंतर्गत ७५ हजार रुपये मिळतील.
नववी ते बारावीपर्यंत मुलीला दरमहा १00 रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल. केंद्र सरकारची आम आदमी विमा योजना व त्यातील शिक्षा सहयोग योजनेचा सुद्धा लाभ मुलीला मिळेल.
एका कुटुंबातील दोन मुलींना, जुळ्या मुलींना लाभ मिळेल.
या योजनेचा लाभ झालेल्या मुलीने दहावीपर्यंत शिक्षण घेतलेच पाहिजे, १८ वर्षांपर्यंत तिचे लग्न होता कामा नये, अशा काही अटी आहेत. त्यांची पूर्तता होईल की नाही याची खात्री ती जन्मताच कशी करणार, दोन्ही अटींबाबत पालकांकडून तसे लिहून घेणार का, याबाबत मात्र अद्याप स्पष्टता नाही. दोन वर्षांपासून रखडलेली ही महिला व बालकल्याण विभागाची योजना अखेर १ जानेवारी २०१४ पासून लागू केली जाणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.