www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यातल्या मदरशांना सुमारे 10 कोटी रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. तेव्हा मदरशांना १० कोटी रुपये, तर वारकरी शिक्षण संस्थांना १०० कोटी रुपये देण्याची वारकरी संप्रदायाची शासनाकडे मागणी केली आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील मदशांना १० कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. याचबरोबर राज्यात वारकरी संप्रदायही जनप्रबोधनाच्या माध्यमांतून महाराष्ट्र घडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्य करत आहे. त्यामुळे मदरश्यांप्रमाणेच वारकरी शिक्षण संस्थांना शासनाने १०० कोटी रुपयांचे अनुदान तात्काळ घोषित करावे, अशी मागणी श्रीवारकरी प्रबोधन महासमितीचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर शास्त्री महाराज यांनी केली आहे.
या विषयी लवकर वारकर्यांचे शिष्टमंडळ महाराष्ट्र शासनाची भेट घेऊन आपली मागणी करणार आहे. ह.भ.प. रामेश्वर शास्त्री महाराज पुढे म्हणाले की, आज वारकरी कीर्तनकारांनी कोट्यवधी लोकांनी कीर्तनाच्या माध्यमांतून व्यसनमुक्त बनवले आहे; आज शेकडो वारकरी शिक्षण संस्थांच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांना देशभक्ती, सदाचार संपन्नता, जातीव्यवस्था निर्मूलन, व्यसनमुक्त बनण्याचे शिक्षण दिले जाते. येथे मुलाचा सज्जन माणुस घडतो. त्यामुळे शासनाने वारकरी शिक्षण संस्थांचाही सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे.
केवळ वारकरी शिक्षण संस्थांना नव्हे, तर वारकरी शिक्षण संस्थेत शिकवणार्या शिक्षकांना अन्य शिक्षकांप्रमाणे वेतन दिले पाहिजे. समाजप्रबोधन करणार्या १८ वर्षांपुढील सर्व कीर्तनकारांना वयाची अट न घालता दरमहा ५००० रुपये वेतन दिले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.