कोकण रेल्वे प्रवाशांना मिळणार का दिलासा?

कोकणचे सुपुत्र रेल्वेमंत्री सुरेश प्रभू घसरलेली कोकण रेल्वे मार्गावर आणणार का?  दुपदरीकरण, इलेक्ट्रीफिकेशन आणि पश्चिम महाराष्ट्राशी कोकण रेल्वेनं जोडला जाणार का, याकडेही लक्ष लागले आहे.

Updated: Feb 26, 2015, 10:31 AM IST
कोकण रेल्वे प्रवाशांना मिळणार का दिलासा? title=

मुंबई : कोकणचे सुपुत्र रेल्वेमंत्री सुरेश प्रभू घसरलेली कोकण रेल्वे मार्गावर आणणार का?  दुपदरीकरण, इलेक्ट्रीफिकेशन आणि पश्चिम महाराष्ट्राशी कोकण रेल्वेनं जोडला जाणार का, याकडेही लक्ष लागले आहे.

सुरेश प्रभू २०१५-१६चा रेल्वे अर्थसंकल्प सादर करतील तेव्हा देशाबरोबर महाराष्ट्राचे विशेष लक्ष असणार आहे. या रेल्वे बजेटमध्ये भरमसाट नवीन रेल्वे आणि प्रकल्पांची घोषणा करण्याऐवजी जुने रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला जाईल अशी शक्यता आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचा हा पहिलाच पूर्ण रेल्वे अर्थसंकल्प असणार आहे. मे २०१४ मध्ये मांडलेले रेल्वे बजेट हे नऊ महिन्यांसाठी होते. त्यावेळी रेल्वेमध्ये गुंतवणुकीवर विशेष भर देण्याची रूपरेषा ठरविण्यात आली होती. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसह हायस्पीड रेल्वे सुरू करणे, रेल्वेमध्ये गुंतवणुकीसाठी खासगीकरण आदी घोषणा करण्यात आल्या होत्या. बुलेट ट्रेनसंदर्भातील रूपरेषा जपान सरकारच्या सहाय्याने तयार करण्यात आली आहे. यासह अनेक प्रकल्प मार्गी लावण्याबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून नवीन घोषणा होण्याची शक्यता आहे.
 
महाराष्ट्राचे सुपुत्र सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असल्याने महाराष्ट्राच्या अपेक्षा स्वाभाविकपणे वाढल्या आहेत. यंदा प्रभूंच्या पोतडीतून काय बाहेर पडणार? वर्षानुवर्षे रखडलेले रेल्वे प्रकल्प मार्गी लागणार का? नवे काही मिळणार का? की पुन्हा जुन्या घोषणांना नवा मुलामा मिळणार. चांद्यापासून बांद्यापर्यंत सार्‍यांचेच लक्ष रेल्वे अर्थसंकल्पाकडे लागले आहे.

कोल्हापूरला कोकण रेल्वेने जोडणार का?
कोकण रेल्वे कोल्हापूरशी जोडण्याचा प्रस्ताव १९९९ साली अस्तित्वात येऊन सर्वेक्षणदेखील झाले. या महत्त्वपूर्ण मार्गावरून संपूर्ण पश्‍चिम आणि दक्षिण महाराष्ट्र देशाच्या सागरीकिनार्‍याशी जोडला जाणार आहे. कोकण मार्गावर मुंबई आणि रत्नागिरी मार्गावर काही संकट आल्यास पर्यायी मार्ग म्हणून मुंबई, पुणे, कोल्हापूर असा रेल्वे मार्ग वापरला जाऊ शकतो.

कोकणचा विकास होण्यासाठी कोकण रेल्वे कोल्हापूरशी जोडणे गरजेचे असून हा मार्ग महत्त्वाचा बायपास म्हणून आपत्कालीन परिस्थितीत वापरला जाऊ शकतो. त्यामुळे या मार्गाचे सर्वेक्षण पुन्हा करून या परिसरातील विकासास चालना द्यावी, अशी मागणी होत आहे.  
 
कोकण रेल्वेच्या सावंतवाडी टर्मिनसची घोषणा झाली असली तरी कोकण रेल्वेच्या दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम रखडले आहे. कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणासाठी ७२० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. ७४१ किलोमीटरच्या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणामुळे डिझेलवर खर्च होणारे ३२५ कोटी रुपये वाचणार आहेत. 

रोहा ते ठोकूर या मार्गाच्या विद्युतीकरणाची योजना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंजूर केली आहे. यामुळे ऊर्जेत पन्नास टक्के बचत होणार आहे. कोकण रेल्वेच्या मध्य रेल्वेच्या हद्दीतील पनवेल-रोहा मार्गाचे दुपदरीकरण मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर २०१७ पर्यंत कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.