नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि शेतीमालाच्या हमीभावासाठी येत्या १ जूनपासून शेतकरी संपावर जाणार असल्याची घोषणा किसान क्रांती या शेतकऱ्यांच्या संघटनेने केली आहे.
या मोहिमेला मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचा दावा किसान क्रांतीच्या समन्वयकाकडून केला गेला आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी संपावर जाऊ नये, असे आवाहन राज्य सरकारने केलेय.
आंदोलकांशी त्यांच्या मागण्यासंदर्भात चर्चा करण्यास राज्य सरकार तयार असल्याचे कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांनी जाहीर केले आहे. शेतकऱ्यांच्या संपाला वाढता प्रतिसाद मिळत आहे.
संपाच्या पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांनी भाजीपाला, दूध शहरात पाठवायचं नाही, आठवडी बाजारात घ्यायचं नाही, माल बाजार समितीत पाठवायचा नाही, अशा बाबींचा समावेश आहे. जो माल निघेल तो घरातच ठेवण्याचे आवाहन किसान क्रांती संघटनेकडून करण्यात आले आहे.