हॉस्पीटलची अरेरावी, पैसे नाही म्हणून रुग्णाला ठेवलं डांबून

मानवतेला काळीमा फासणारी घटना नागपूरातील एका खाजगी रुग्णालयात घडलीय. रुग्णालयाचं बिल चुकवलं नसल्यानं या हॉस्पिटलनं चक्क त्याला डांबून ठेवलंय. 

Updated: May 24, 2016, 11:30 PM IST
हॉस्पीटलची अरेरावी, पैसे नाही म्हणून रुग्णाला ठेवलं डांबून  title=

अखिलेश हळवे, नागपूर : मानवतेला काळीमा फासणारी घटना नागपूरातील एका खाजगी रुग्णालयात घडलीय. रुग्णालयाचं बिल चुकवलं नसल्यानं या हॉस्पिटलनं चक्क त्याला डांबून ठेवलंय. 

बिल थकवलं म्हणून... 

गुडघ्यापासून पाय नसलेल्या २६ वर्षीय संजय खांडवाये नावाच्या आदिवासी तरुणाचा आधी दैवानं घात केला आणि नंतर एका खाजगी रुग्णालयानं... दुचाकीवरुन जात असताना एका एसटीनं दिलेल्या धडकेत संजयच्या उजव्या पायाला जबर दुखापत झाली. त्याला नागपूरच्या सक्करदरा भागातल्या या ग्रीनसिटी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयानं पाय कापून त्याचा जीव वाचवला. मात्र, त्याची वाजवीपेक्षा जास्त किंमत वसूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संजयनं केलाय. ४० हजार आणि इतर खर्चाचं बिल देऊनही ८ एप्रिलला हॉस्पिटलनं सुट्टी दिली नसल्याचा आरोप संजयनं केलाय. 

सख्या बहिणीच्या लग्नालाही मुकावं लागलं

उपचारावर दीड लाख खर्च झाल्याचा दावा करत एका पायानं अधू झालेल्या संजयनं पळून जाऊ नये म्हणून हॉस्पिटल प्रशासनानं त्याला वरच्या मजल्यावर डांबून ठेवलं. इतकंच नाहीतर त्याच्या कुटुंबीयांनाही त्याची भेट नाकारण्यात आली. एवढंच नाही तर सख्ख्या बहिणीचं लग्न असतानाही त्याला सोडलं नाही. कहर म्हणजे हॉस्पिटलच्या बिलाचे पैसे चुकवण्यासाठी 'संजयच्या वडिलांनी हॉस्पिटलचे चौकीदार म्हणून नोकरी करावी' असा अजब सल्लाही हॉस्पिटलकडून देण्यात आला. त्याचवेळी देवेंद्र गणवीर हे समाजसेवक आणि 'झी २४ तास' संजयच्या मदतीला धावून गेलं. 

'वडिलांनी करावी हॉस्पीटलची चाकरी'

याबाबत आम्ही हॉस्पिटलची बाजू जाणून घेण्याचाही प्रयत्न केला.. सुरुवातीला हॉस्पिटल प्रभारी यांनी संजयचे हॉस्पिटल बिल माफ करण्यास तयार असल्याची सारवासारव केली. मात्र, औषधाचे पैसे त्यानं चुकवावे अशी भूमिका त्यांनी घेतली... परंतु, औषधाचे पैसे संबधित औषध विक्रेता वसूल करु शकत असताना त्यात रुग्णालयाची भूमिका काय? असं विचारलं असता डॉ गौतम प्रसाद या प्रभारींनी तिथून काढता पाय घेतला. 

दीड महिन्यांपासून बंदिस्त

सरतेशेवटी 'झी २४ तास'च्या पुढाकारानं दीड महिन्यांपासून बंदिस्त असलेल्या संजयची सुटका झाली. मात्र यानिमित्ताने खाजगी रुग्णालयाचा व्यावसायिक बाजार पुन्हा एकदा उघड झालाय. त्यामुळं संजयसारख्या आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या घटकांचा वाली कोण? असा सवाल उपस्थित होतोय.