कोकणचा राजा संकटात, दर्यापूरला वीज कोसळून महिलेचा मृत्यू

अवकाळी पावसाचा जोर कोकणातल्या रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदूर्ग भागात पहायला मिळतोय. कालच्या जोरदार पावसानंतर आजही कोकणात संततधार सुरू आहे. त्यामुळं हापूस आंबा धोक्यात येण्याची भीती आहे. 

Updated: Mar 1, 2015, 11:57 PM IST
कोकणचा राजा संकटात, दर्यापूरला वीज कोसळून महिलेचा मृत्यू title=

रत्नागिरी: अवकाळी पावसाचा जोर कोकणातल्या रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदूर्ग भागात पहायला मिळतोय. कालच्या जोरदार पावसानंतर आजही कोकणात संततधार सुरू आहे. त्यामुळं हापूस आंबा धोक्यात येण्याची भीती आहे. 

काही ठिकाणी आंबा झाडावरून उतवण्यास तयार झालाय. अशा वेळी आलेल्या पावसानं आंब्यावर डाग पडण्याची शक्यता आहे. तसंच काजूचं पीकही धोक्यात येण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसाचा सर्वात मोठा फटका हा फळांचा राजा हापूसला बसणार आहे. या पावसानं आंब्याच्या मोहरावर बुरशीचा प्रादुर्भाव होणार आहे. त्यामुळे दुबार फवारणी आणि आंब्याचा हंगाम देखील लांबण्याची शक्यता वर्तवली जातेय. 

या पावसानं आंब्याच्या झाडावर तयार झालेली कैरी सुद्धा गळून गेलीय. शनिवारी झालेल्या अवकाळी पावसानं रायगड जिल्ह्यात वीटभट्टयांचं लाखो रूपयांचं नुकसान झालं. पांढरा कांदा, तोंडली पिकांबरोबरच आंबा आणि कडधान्याला मोठा फटका बसला आहे. हे नुकसान कसंभरून काढायचं असा 
प्रश्‍न त्यांच्यासमोर आवासून उभा आहे. नुकसानीचे पंचनामे तातडीनं करावेत अशी मागणी होत आहे.

नाशिक: अवकाळी पावसामुळं नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्ष, कांदा, गहू, हरभरा पिकला फटका बसलाय. त्यामुळे १० ते १५ टक्के उत्पन्न कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळं द्राक्षांच्या निर्यातीवरही परिणाम होण्याची भीती बोलून दाखवली जातेय. ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीनं फवारणी सुरु करण्याचं आवाहन नाशिक जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी केलंय. 

अमरावती: अमरावती जिल्ह्यात काल संध्याकाळ पासून अवकाळी पाउस आणि वादळी वाऱ्यामुळं पिकांचं मोठ नुकसान तर झालच आहे. त्यातच दर्यापूर तालुक्यात वीज पडून आदिवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. शेतात काम करत असताना आदिवासी महिलेच्या अंगावर वीज पडली. सुमरती पुणाजी कासदेकर असं या महिलेचं नाव असून, ४० वर्षीय या महिलेचा वीज पडून जागेवरच मृत्यू झाला. 

बबली पुणाजी कासदेकर १८ वर्ष ही मृतकाची मुलगी किरकोळ जखमी झाली असून उमरी मंदिर या गावत ही घटना घडलीय. 
 
मुंबई: मार्च मध्ये मुंबईकरांना घामाघुम करणाऱ्या निसर्गानं आपलं लहरीपण पुन्हा एकदा सिद्ध केलंय. गेल्या दोन-चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता कमी झाली आणि रात्रीच्या तापमानातही घट झाल्यानं, गुलाबी थंडी पुन्हा सुरु झाली असं वाटत होतं. मात्र शनिवारची आणि  रविवारची सकाळ ‘उगवला नाही सूर्य पूर्वेचा’अशा स्वरुपात झाली. सकाळपासूनच आकाश ढगाळलेलं होतं आणि अपेक्षा नसता पाऊस अवेळी बरसला. पश्चिम उपनगरात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. रविवार असल्यानं  बोरीवली संजय गांधी नशनल पार्क, गोराई, जुहू चौपाटीवर आबालवृद्धांची गर्दी उसळली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.