मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज डाव्या संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलीय. कोल्हापुरात कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. डाव्यांनी पुकारलेल्या या बंदमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही सामील होणार आहे.
काँग्रेसचा या बंदला पाठिंबा असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसनंही बंदला पाठिंबा दर्शवलाय. रिपाइंनही बंदला पाठिंबा दिलाय. कॉ. पानसरेवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात निषेध रॅलीच आयोजन करण्यात आलंय.
नागपूरच्या महात्मा गांधी चौकात साहित्यिक, कामगार नेते आणि डाव्या संघटनेच्या पदाधिका-यांनी कॉ. पानसरेंच्या हत्येविरोधात निदर्शने केली. पानसरे यांचा मृत्यू म्हणजे एका विचारसरणीवर झालेला हल्ला असल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली. दुसरीकडे केंद्रीय दळण-वळण मंत्री नितीन गडकरी यांनी देखील पानसरे यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या मारेकऱ्यांना राज्य सरकार लवकरच अटक करेल असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर टीका होत असतानाच कॉम्रेड पानसरे यांच्या अत्यंतसंस्काराला स्वपक्षीय डाव्या ज्येष्ठ नेतेही अनुपस्थित राहिले. माकपचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश करात, नेत्या वृंदा करात, सीताराम येच्युरी, डी. राजा, निलोत्पल बसू यांच्यापैकी कोणीही या अत्यंसंस्काराला उपस्थित राहिले नाहीत. जीवनभर पानसरेंनी ज्या विचारासाठी संघर्ष केला, त्याच पक्षाच्या बड्या नेत्यांनी त्यांच्या अत्यंसंस्काराकडे पाठ फिरवली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.