पुणे : पुण्यात आज पंधरा टक्के पाणीकपातीची घोषणा होण्याची शक्यता होती. मात्र, पालकमंत्री गिरीष बापट यांच्या वाढदिवसामुळे पाणीकपातीची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. पाणीकपात लागू झाल्यास पुणेकरांना दिवसातून एकदाच पाणी पुरवठा होईल.
पावसानं ओढ दिल्यामुळे शहरात पाण्याचं नियोजन करण्यात येतंय. पाणीकपातीबाबत निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला आहे. आता केवळ अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्माच पाणीसाठा उपलब्ध आहे.
गतवर्षी आजच्या तारखेला धरणांमध्ये २८ टीएमसी म्हणजेच ९५ टक्के पाणीसाठा होता. यंदा मात्र केवळ १५ टीएमसी म्हणजेच जेमतेम ५० टक्के पाणीच शिल्लक आहे. हे पाणी वर्षभर पुरवायचं असेल तर पाणीकपातीला पर्याय नाही.
यासंदर्भात पुण्याचे पालकमंत्री, महापालिकेतील पदाधिकारी तसेच संबंधीत अधिका-यांची बैठक आज होणार होती. त्यात पाणीकपातीचा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता होती. मात्र, पालकमंत्र्याचा वाढदिवस असल्याने ही बैठक झाली नाही. त्यामुळे पाणीकपातीचा निर्णय एक दिवस पुढे ढकलण्यात आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.