औरंगाबाद : पैशाची देवणाघेवाण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'युनायटेड पेमेंट इंटरफेस' म्हणजे 'यूपीआय' अॅपच्या माध्यमातून महाराष्ट्र बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय.
बँकेच्या डिजिटल तंत्रज्ञानातील त्रुटीचा फायदा घेत काही लोकांनी ही फसवणूक केली आहे. पुणे जिल्ह्यातील 23 शाखांमधल्या काही खात्यांमधून या पद्धतीनं 6 कोटी 14 लाख रुपयांची लूट झाली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र बँकेनं शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय.
याप्रकरणी 50 खातेधारकांवर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर औरंगाबादेतही 1 हजार 214 बँक खात्यातून 9 कोटी 43 लाख 67 हजार रुपये लांबवल्याचं समोर आलंय...
उल्लेखनीय म्हणजे यात औरंगाबाद शहरातील 800 खाती आहेत तर उर्वरीत ग्रामीण भागातील आहेत. खास करून बुहुतांशी झिरो बॅलन्स असलेल्या 'जन धन' खात्यामधून हा प्रकार झाल्याचं समोर येतंय... तर नाशिमध्येही असला प्रकार घडला असून दोन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. चौघांकडून पैसै सुद्धा वसूल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. औरंगाबादेतही काही नागरिकांच्या तक्रारीवरून फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.