झी एक्सक्लुझिव्ह : आग औरंगाबादी... बंब उल्हासनगरी!

औरंगाबादमध्ये कुठंही आग लागल्यावर १०१ नंबरवर फोन करण्याची घाई करू नका... हो आम्ही हे सांगतोय... त्याला कारणही तसंच आहे... कारण हा नंबर थेट उल्हास नगरच्या फायर ब्रिगेड ऑफिसला लागतोय. शासनाची ही आपत्कालीन सेवाच कोलमडली असल्याचं यावरून स्पष्ट होतंय.

Updated: Feb 25, 2015, 10:06 PM IST
झी एक्सक्लुझिव्ह : आग औरंगाबादी... बंब उल्हासनगरी! title=

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये कुठंही आग लागल्यावर १०१ नंबरवर फोन करण्याची घाई करू नका... हो आम्ही हे सांगतोय... त्याला कारणही तसंच आहे... कारण हा नंबर थेट उल्हास नगरच्या फायर ब्रिगेड ऑफिसला लागतोय. शासनाची ही आपत्कालीन सेवाच कोलमडली असल्याचं यावरून स्पष्ट होतंय.

दोन दिवसांपूर्वी औरंगाबादच्या शहागंजजवळ काही दुकानांना आग लागली होती. त्यावेळी संबंधित दुकानदारांनी अग्निशमन दलाला फोन केला. मात्र हा फोन लावल्यानंतर असं विचित्र संभाषण ऐकायला मिळालं. 'आग लागली असली तरी आमच्याजवळ पाणी नाही म्हणून आम्ही येऊ शकत नाही' फायर ब्रिगेडला फोन केल्यावर त्यांचं म्हणणं होतं... दरम्यान, शहागंजमधली ही दुकानं जळून खाक झाली. मात्र अग्निशमन दल काही पोहोचलंच नाही. 

त्यामुळे, हा नंबर तर चुकीचा लागला नाही ना... अग्निशमन दल असं कसं काय सांगू शकतं? हे शोधण्याचा झी मीडियानं प्रयत्न केला. त्यानंतर, आमच्या प्रतिनिधीनं १०१ नंबरवर फोन लावला. सुरुवातीला बराच वेळ फोन लागला नाही. त्यानंतर हा फोन लागला तो थेट उल्हासनगरच्या फायर ब्रिगेडला... 

यासंदर्भात, झी मीडियानं शहराच्या उपमहापौरांना याबाबत विचारणा केली. त्यांनीही अग्निशमन दलाला फोन केला. तर तोही उल्हासनगरला लागला...

म्हणजेच, आग जरी औरंगाबादेत लागली तरी १०१ नंबर द्वारे औरंगाबाद फायर ब्रिगेडला हा नंबर लागतच नाही... हा फोन लागतो तो उल्हासनगरलाच... त्यामुळे या आपात्कालीन सेवा औरंगाबादकरांसाठी नाही का? असा प्रश्न पडतोय. 

केवळ फायर ब्रिगेडच नाही तर पोलिसांचा १०० नंबर सुद्धा शहरात न लागता उल्हासनगरलाच लागतोय. या सिस्टममध्ये काही तरी मोठा बिघाड असल्यानं हा प्रकार घडत असावा. मात्र, तुर्तास तरी औरंगाबादकरांनो, अडचणीच्यावेळी आपात्कालीन नंबरवर फोन करून अडचणी वाढवण्यापेक्षा स्थानिक नंबरवरच कॉल करा... म्हणजे निदान मदत मिळेल तरी...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.