सातारा : महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय... जाती-पंचायतीचं भूत अजूनही लोकांच्या मानगुटीवरून उतरलेलं नाही, हे वारंवार समोर आलंय. आत्ताही पुन्हा तेच घडलंय.
बापानं मुलीवर बलात्कार केला म्हणून बापाला १० फटके मारण्याचं फर्मान बजावलंच शिवाय मुलीला दोषी करार देऊन तिलाही १० काठीचे फटके मारण्यात आले... धक्कादायक म्हणजे ही मुलगी अल्पवयीन आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
ही घटना सातारा जिल्ह्यातल्या पाचवड गावात घडलीय. आरोपी बापानं आपल्या अल्पवयीन मुलीवर तब्बल चार महिने बलात्कार केला. या मुलीला आई नाही.
या अत्याचारानंतर ही मुलगी गर्भार राहिली... ही गोष्ट गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कायद्याला धाब्यावर बसवत बापाला त्यानं मुलीवर केलेल्या अत्याचारासाठी १० फटके लगावण्याची शिक्षा फर्मावली.
तर, मुलीनंही तोंड न उघडता चूपचापपणे आपल्या बापाशी शरीरसंबंध ठेवले... या घटनेची कुठेही वाच्यता केली नाही... याला विरोध केला नाही... या कारणांमुळे तिला दोषी ठरवण्यात आलं. यासाठी या अल्पवयीन मुलीलाही गावाच्या समोर १० फटके मारण्यात आले.
एका आरटीआय कार्यकर्त्यानं या घटनेची तक्रार पोलिसांत केल्यानंतर ही घटना उघडकीस आलीय. या कार्यकर्त्यांनी पुरावे म्हणून या घटनेचा एक व्हिडिओच सादर केलाय. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची तक्रार दाखल करत अधिक चौकशी सुरू केली.