ठाणे : माथेफिरु हसनैन वरेकर यांने कुटुंबातील १४ जणांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत: आत्महत्या केली. हसनैनच्या खोलीत पोलिसांना स्किझोफ्रेनिया या आजारावरील दोन औषधे सापडलीत. हाच धागा पकडून हसनैन मनोरुग्ण होता का, या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केलाय.
पोलिसांनी मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या परिसरांतील मानसोपचारतज्ज्ञांशी संबंधित संघटनांशी संपर्क सुरू केलाय. तो उपचार घेत होता का, अशी विचारणा पोलिसांकडून केली जात आहे. तर ठाणे पोलिसांनी हसनैनच्या घरातून अन्न, औषध तसेच शीतपेयांचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.
दरम्यान, हसनैनने हे हत्याकांड का केले याबाबत बहिणीच्या जबाबातून कोणतीही माहिती पोलिसांना हाती लागलेली नाही. तो धार्मिक प्रवृत्तीचा होता, एवढीच माहिती पुढे आलेय.
हसनैनने दिलेल्या शीतपेय तसेच अन्नात कोणत्याही प्रकारचे गुंगीचे औषध अथवा विष होते का यासंबंधीची विचारणा पोलिसांनी तज्ज्ञांकडे केली आहे. मात्र यासंबंधीचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला नव्हता, अशी माहिती ठाणे पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.
हसनैन कर्जबाजारी होता किंवा त्याने सुपारीचा व्यापार सुरू करण्यासाठी बहिणीकडून काही रक्कम उधार घेतली होती, अशी कारणे यापूर्वी स्पष्ट झाली आहेत. मात्र, औषध तपासणीचा अहवाल आल्यानंतर तपासाची दिशा स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, कर्मकांड, बुवाबाजी, जन्नत मिळविण्यासाठी केलेले कृत्य अशा अनेक अफवा पसरत असल्या तरी त्याबाबतची कोणतीही ठोस माहिती मिळालेली नसल्याचे पोलिसांनी म्हटलेय.