शेतकरी वाऱ्यावर, व्यापाऱ्यांची मुजोरी कायम? मंत्र्यांची चुपी

कांदा खराबव झाला तरी चालेल पण व्यापा-यांसमोर झुकणार नाही, असा पवित्रा नाशिक जिल्ह्यात शेतकरी संघटनेने घेतलाय. नाशिक जिल्ह्यात पंधरवड्यापासून कांदा खरेदी बंद असल्याने संपूर्ण देशात कांदा टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. 

Updated: Jul 26, 2016, 07:49 PM IST
शेतकरी वाऱ्यावर, व्यापाऱ्यांची मुजोरी कायम? मंत्र्यांची चुपी title=

नाशिक : कांदा खराबव झाला तरी चालेल पण व्यापा-यांसमोर झुकणार नाही, असा पवित्रा नाशिक जिल्ह्यात शेतकरी संघटनेने घेतलाय. नाशिक जिल्ह्यात पंधरवड्यापासून कांदा खरेदी बंद असल्याने संपूर्ण देशात कांदा टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. 

शेतकऱ्यांचा कांदा पावसाळी हवेने खराब होत असताना पणनमंत्री सदाभाऊ खोत तिढा सोडवण्यासाठी नाशिक जिल्ह्यात येत का नाहीत असा सवाल शेतकरी विचारत आहेत. नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार समित्या सध्या ओस पड़ल्या आहेत. दररोज होणारे व्यवहार ठप्प असल्याने कोट्यवधी रूपयांचा कांदा चाळीत पडून आहे सरकारने नियमनमुक्ती केली पण शेतकऱ्याला सुरक्षा दिलेली नाही. 

माल खराब झाल्यास जबाबदारी कुणाची याचं उत्तर कोणाकडे नाही. व्यापारी कायदेशीर चाली खेळत आहेत. यात शेतक-यांचा बळी जातोय. कांदा खराब झाला तरी चालेल पण व्यापा-यांसमोर न झुकण्याचा शेतकरी संघटनेने निर्धार केला आहे. नियमनमुक्ती आणि आडतमुक्ती कोणाच्या फायद्यासाठी याची चर्चा होणं आवश्यक आहे. सदाभाऊ खोत पणनमंत्री झाल्यावर नाशिकमध्ये येणं अपेक्षित होते. पण त्यांना वेळ मिळालेला नाही. 

नियमन मुक्तीत शेतक-याला थेट विक्रीचे धडे देणं, इतर राज्यातल्या व्यापा-यांना नाशिकमध्ये आणून थेट खरेदी करण्यास सुरूवात करणं गरजेचं आहे. नाही तर नियमनमुक्ती शेतक-यांसाठी फास ठरण्याची शक्यता आहे.