मुंबई : नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा फायदा आता ठग लोक कसे घेतात याचा प्रत्यय नुकताच अंबरनाथ मध्ये एका दाम्पत्याला आलाय, त्यामुळे आयएसडी कोड 0092 या क्रमांकाने सुरू होणा-या क्रमांकावरून तुम्हाला फोन आल्यास सावधान! कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा वापर करून हा फोन तुम्हाला लुबाडण्यासाठी केलेला असू शकतो.
अंबरनाथ पश्चिम नवरे पार्क भागात राहणाऱ्या हेमा पाटील यांच्या मोबाईलवर आज सकाळी एक मिस कॉल आला, या मिस कॉलवर त्यांचे पती महेश पाटील यांनी फोन केला असता पलीकडून बोलणारी व्यक्तीने तुम्हाला २५ लाख रुपयांची लॉटरी लागली आहे असे सांगितले. मात्र आम्हाला २५ लाखाची लॉटरी कशी लागली असे महेश पाटील यांनी त्यांना विचारले, तेव्हा समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने पाटील यांना सागितले कि KBCL मध्ये भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी आय़डीयाचे ५००० सीम निवडले आहेत त्यात तुमचा लकी सीम निवडला गेला आहे, त्यामुळे तुम्हाला ही लॉटरी लागली आहे, मात्र तुम्हाला २५ लाख पाहिजे असतील तर अगोदर शासनाचा २५ हजार रुपये कर बँकेत जमा करावा लागेल. २५ हजार रुपये मागितल्याने पाटील दाम्पत्यांना संशय आला, जर आपल्याला २५ लाख लागले तर शासनाने २५ हजार कापूनच आम्हाला दिले पाहिजे, त्यामुळे पाटील यांनी आमच्या २५ लाखातून २५ हजार रुपये काढून घ्या असे सांगितले,
पाटील यांनी असे म्हणताच समोरून बोलणारा व्यक्ती भडकला त्यामुळे पाटील यांनी फोन ठेऊन दिला. हे सर्व संभाषण पाटील यांनी त्यांच्या मोबाईल फोन मध्ये रेकॉर्ड केल आहे.
हेमा पाटील म्हणाल्या कि आम्ही समजूतदार आहोत म्हणून आम्हाला या लोकांचा डाव कळला मात्र अश्या प्रकारे पलीकडून बोलणारी व्यक्ती लाखो रुपयांची लॉटरीचे बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून त्या बदल्यात काही रक्कम बँक खात्यात जमा करण्यास तुम्हाला भरीस पाडू शकते.. त्यामुळे पाकिस्तानचा आयएसडी कोड 0092 या क्रमांकाने सुरू होणा-या क्रमांकावरून तुम्हाला फोन आल्यास सावधान! कारण हा फोन लुबाडण्यासाठी केलेला असू शकतो.
मल्टिनॅशनल कंपनीतून बोलत असल्याचे सांगत हे ठग तुम्ही जिंकलेले बक्षीस किंवा लॉटरी मिळवण्यासाठी एखाद्या बँकेच्या खात्याचा नंबर देत त्यास पैसे जमा करण्यास सांगतात. आपण फसवलो गेलो हे समजेपर्यंत आणि संबंधित व्यक्ती तपास करेपर्यंत बँकेच्या खात्यातून पैसे काढून घेतले जातात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.