राष्ट्रीय महामार्गांवर ई-टोलची सुविधा लवकरच

मुंबई : आता तुम्हाला टोल भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

Updated: Feb 18, 2016, 09:25 AM IST
राष्ट्रीय महामार्गांवर ई-टोलची सुविधा लवकरच title=

मुंबई : आता तुम्हाला टोल भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही. येत्या एप्रिल महिन्यापासून राष्ट्रीय महामार्गांवर ई-टोल भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे केंद्रीय वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी घोषित केले. 'मेक इन इंडिया' सप्ताहाच्या निमित्ताने गडकरी मुंबईत बोलत होते.

सुरुवातीला मुंबई - दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर ही सेवा सुरु होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील ३६० टोलनाक्यांवर ही सुविधा दिली जाईल. ई-टोल भरण्याची इच्छा असलेल्या वाहनधारकांच्या वाहनावर एक स्टिकर लावला जाईल. टोल नाक्यांवर या स्टिकरचे स्कॅनिंग केले जाईल. स्कॅन करताच ग्राहकाच्या बँक खात्यातून टोलची रक्कम वजा होईल. मोबाईलच्या रिचार्जप्रमाणेच ही रक्कम रिचार्ज केली जाऊ शकेल. ही रक्कम संपताच वाहनधारकाला त्याच्या खात्यात रक्कम जमा करण्यासाठी एक मेसेज पाठवला जाईल.

टोल भरण्यासाठीच्या लांबच लांब रांगांमध्ये उभे राहिल्याने लोकांचा वेळ वाया जातो. तसेच इंधनाचाही मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. म्हणून टोल कंपनी आणि बँक यांच्यात समन्वय साधून ही योजना सुरू करत असल्याचे गडकरी म्हणाले. महाराष्ट्रातील टोलमुक्तीच्या आश्वासनाविषयी विचारले असता हा प्रश्न राज्य सरकारला विचारा, असे त्यांनी सांगितले.

देशात ३०० ठिकाणी रिंग रोड बांधण्याची योजना असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे देशात दोन हजार ठिकाणी बंदरे उभारण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी सांगितले.