पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये गोल्ड मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले दत्ता फुगे यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. पण ज्या साडेतीन किलोंच्या सोन्याच्या शर्टामुळे दत्ता फुगे प्रसिद्धी झोतात आले तोच शर्ट गायब झाला आहे.
पोलिसांनी या सोन्याच्या शर्टविषयी त्यांचा मुलगा शुभम फुगेकडे चौकशी केली तेव्हा हा शर्ट चिंचवडच्या रांका ज्वेलर्सकडे वडिलांनी सुरक्षित ठेवण्यासाठी दिला असल्याचं शुभमनं सांगितलं. रांका ज्वेलर्सनी मात्र आम्ही फक्त शर्ट तयार करून दिला, यानंतर तो आमच्याकडे आला नाही, असं स्पष्टीकरण दिलं आहे.
रांका ज्वेलर्सच्या या स्पष्टीकरणानंतर कुटुंबाशी बोलून सांगतो, अशी प्रतिक्रिया शुभम फुगेनं दिली आहे. सोन्याचा शर्ट बनवल्यानंतर दत्ता फुगेंच्या आर्थिक अडचणी सुरु झाल्या. त्यामुळे त्यांनी हा शर्ट विकल्याचं बोललं जात आहे.