सतीश मोहिते, नांदेड : डॉक्टर आणि रुग्णांमधलं नातं अधिक दृढ करण्यासाठी विविध उपक्रम नांदेडमध्ये राबवण्यात येणार आहे.
डॉक्टरांवरील वाढते हल्ले... या हल्ल्यांच्या निषेधार्थ डॉक्टरांनी पुकारलेले संप... आणि संपामुळं होणारे रूग्णांचे हाल... या सततच्या घटनांमुळं डॉक्टर आणि समाजातील दुरावा आणखी वाढीला लागलाय... अशा काळात 'झी 24 तास'नं जबाबदार माध्यम म्हणून संप मिटवण्याचा प्रयत्न केला. पण त्या प्रयत्नांचं कौतुक करण्याऐवजी, इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेचे सेक्रेटरी डॉ. पार्थिव संघवी यांनी 'झी 24 तास'च्या बदनामीची मोहीम सुरू केली. 'झी 24 तास'चे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांच्या विरोधात उन्मत्त भाषा वापरली. 'डॉ. निरगुडकर यांच्यावर उपचार करू नका' असे बदनामीकारक मॅसेज सोशल मीडियातून पसरवायचा प्रयत्न केला.
एकीकडं डॉक्टर पदाधिकाऱ्यांची ही अरेरावी... तर दुसरीकडं हा दुरावा कमी करण्यासाठी नांदेडमधील डॉक्टरांनी स्वतःहून 'एक पाऊल पुढे' टाकलंय... डॉक्टर आणि रुग्णांमधील नातं पुन्हा दृढ करण्यासाठी नांदेड पॅटर्न राबवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतलाय. कट प्रॅक्टिस बंद करावी, कमीत कमी बिल आकारणी करावी, असे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. संपकाळात 'झी 24 तास'चे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांना आलेल्या धमकीचे मेसेज चुकीचे असल्याचंही या डॉक्टरांनी म्हटलंय.
डॉ. पार्थिव संघवी यांच्यासारख्या पदाधिकाऱ्यांमुळं एकीकडं डॉक्टरांबद्दल मत कलुषित होत असताना, नांदेडच्या डॉक्टरांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. पण हे केवळ ठरावापुरतं मर्यादित न राहता, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होण्याची गरज आहे. हा नांदेड पॅटर्न महाराष्ट्रभर राबवण्याची आवश्यकता आहे.