हातकणंगले : कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यात गरीब रुग्णांसाठी काम करणाऱ्या एका डॉक्टर दांपत्यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
डॉक्टर उद्धव आणि प्रज्ञा कुलकर्णी गेली ४० वर्ष रुकडी नावाच्या खेड्यात दवाखाना चालवत होते. रात्री दरोखडेखोरांनी हत्या करून कुलकर्णी दाम्पत्याचा घरचा बराच ऐवज लांबलाय. कुलकर्णी दाम्पत्याचा घर आणि दवाखाना एकत्र होतं. रुग्णसेवेचा वसा घेऊन काम करणारं हे दाम्पत्य अपरात्री गरीब रुग्णांसाठी उपलब्ध असे. त्यांमुळेच त्यांच्या जाण्यानं साऱ्या पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होतेय.
रुकडीतील सरकारी रुग्णालयासमोर राहणार्या डॉ. उद्धव कुलकर्णी व डॉ. प्रज्ञा कुलकर्णी या वृद्ध डॉक्टर दाम्पत्याची अज्ञातांनी हत्या केली आहे. कुलकर्णी दाम्पत्य हे रुकडीत गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. त्याशिवाय याच गावात त्यांचा स्वतःचा दवाखाना असून गेली अनेक वर्षे ते रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांना अपत्य नसल्याने ते दोघेच या दुमजली बंगल्यात वास्तव्याला होते. आज सकाळी घराचा दरवाजा उघडला नसल्याने लोकांनी अधिक चौकशी केली असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
या घटनेची माहिती पोलिसांना कळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत, घटनास्थळाचा पंचनामा केला. घटनास्थळी ठसेतज्ज्ञांसह श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
डॉ. कुलकर्णी दाम्पत्याने रुग्णांची गेली अनेक वर्षे मनोभावे आणि अल्प दरात सेवा केलीय. त्यामुळे त्यांची या भागात प्रचंड लोकप्रियता होती. मात्र या दाम्पत्याची हत्या झाल्याने सर्व रुकडी गाव आणि पंचक्रोशी शोकसागरात बुडाली आहे.