ठाणे : मुरबाड तालुक्यातलं धसई हे गाव महाराष्ट्रातलं पहिलं कॅशलेस गाव ठरलंय. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत रोकडमुक्त व्यवहार करण्याच्या दिशेनं या गावानं आज पहिलं पाऊल टाकलं.
ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातलं हे आदिवासी धसई गाव... तिथल्या गुरूकृपा किराणा स्टोअरमध्ये येऊन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्याकडचं कार्ड स्वाइप करून एक किलो तांदूळ विकत घेतलेत... आणि याच माध्यमातून महाराष्ट्रात सुरूवात झाली नव्या क्रांतीची...
नोटाबंदीच्या निर्णयानंतर रोखमुक्त व्यवहार सुरू करणारं धसई हे राज्यातलं पहिलं गाव ठरलंय. या परिसरात ३५ ते ४० लहान मोठे आदिवासी पाडे आणि गावं आहेत. या सर्व गावांची मुख्य बाजारपेठ म्हणजे धसई... केंद्र सरकारनं ५०० आणि एक हजाराच्या जुन्या नोटा बंद केल्यानंतर देशात अर्थकल्लोळ उडाला. त्याचा फटका धसई बाजारपेठेलाही बसला. या परिस्थितीवर मात करण्यासाठी गावक-यांनी शोधला अनोखा मार्ग... गाव रोकडमुक्त करण्याचा...
त्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी पुढाकार घेतला. एक रूपयापासून कितीही रकमेचे व्यवहार करण्यासाठी नागरिकांनी डेबिट कार्डांचा वापर करावा, यासाठी त्यांनी जनजागृती केली.
गावातल्या प्रत्येक व्यापाऱ्याला स्वाईप मशिन देण्यासाठी 'बँक ऑफ बडोदा'नं मदतीचा हात पुढं केला. भांडी विक्रेता, ज्वेलर्स, इलेक्ट्रॉनिक्स दुकान, मोटार वाहन खरेदी, गॅरेज, केस कापण्याचं सलून, मेडिकल स्टोअर्स, चिकन-मटन विक्रेते, मच्छी विक्रेते, भाजी विक्रेते, वडापाव विक्रेते, लहान मोठी हॉटेल्स, चायनीज फूड सेंटर, बेकरी, डॉक्टर आणि किराणा मालाचे दुकानदार अशा सर्वांनाच ही यंत्र देण्यात आलीत. कोणत्याही रोख रकमेऐवजी वस्तूंची खरेदी विक्री सुरू झाल्यानं ग्राहक तसंच व्यापारीही समाधानी आहेत.
ग्रामीण भागात धसईसारखी हजारो गावं आहेत. तिथले ग्रामस्थ, शेतकरी आणि व्यापारी दैनंदिन व्यवहारांसाठी डेबिट कार्ड वापरू लागले तर सर्वच व्यवहार कॅशलेस होतील. धसई गावचा हा आदर्श आता इतर गावांनीही घेण्याची गरज आहे.