सोलापूर : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, यासाठी सुरू झालेलं आंदोलन आता चांगलंच पेटलंय. एकीकडं या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय, तर दुसरीकडे धनगरांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी आदिवासी नेत्यांनीही दिल्लीदरबारी धडक मारलीय.
उठ धनगरा, जागा हो... अशी हाक देत धनगर समाजानं सुरू केलेल्या आंदोलनाचा भडका उडालाय.सोलापूर येथील पंढरपूर मोहोळ रस्त्यावर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रात्री दोन एसटी बस पेटवून दिल्या. शिवाय सोलापूर-पुणे हायवेवर शेटफळ जवळ दोन बसगाड्यांवर दगडफेकही केली. धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावं, यासाठी बारामतीमध्ये गेल्या 21 जुलैपासून सुरू झालेलं आंदोलन आता हिंसक बनलंय.
धनगरांच्या आरक्षणाला विरोध करणारे आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे आणि क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांचे पुतळेही जाळण्यात आलेत. कालच्या राड्यानंतर पोलिसांनी 21 जणांवर जमावबंदी कायद्यानुसार कारवाई केलीय. त्यामुळं बारामतीत सोमवारी तणावपूर्ण शांतता होती.
तर दुसरीकडं धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करण्यास आदिवासी समाजानं जोरदार विरोध केलाय. या मुद्यावर महाराष्ट्र सरकारनं अद्याप ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळं उपमुख्यमंत्री अजित पवारांना आदिवासींच्या रोषाचा सामना करावा लागला. नंदूरबारमध्ये आदिवासींनी अजित पवारांच्या गाडीला घेराव घालून निषेध केला.
यावेळी आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. धनगर आरक्षणामुळे आदिवासींच्या आरक्षणाला धक्का पोहचणार असल्याचा आंदोलकांचा दावा आहे. आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनीही यापूर्वीच धनगर आरक्षणाला विरोध केलाय.
आरक्षणाच्या मुद्यावरून धनगर आणि आदिवासी समाज एकमेकांविरोधात उभे ठाकलेत.आदिवासी नेत्यांनीही आक्रमक पवित्रा घेत, सोमवारी थेट दिल्लीमध्ये धडक मारली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं.
धनगरांना आधीच साडे तीन टक्के आरक्षण असल्यानं, त्यांचा आदिवासीमध्ये समावेश करू नये, अशी मागणी पिचड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं केलीय. वेळ पडल्यास मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा इशाराही पिचड आणि विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांनी दिलाय.
एकीकडे धनगर समाज, तर दुसरीकडं आदिवासी समाज, अशा अडकित्त्यामध्ये मुख्यमंत्री चव्हाण सापडलेत. त्यातून तोडगा काढताना, पृथ्वीबाबांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.