दरोड्याला वेगळं वळण, नवऱ्याला संपवण्यासाठी मुलीच्या बॉयफ्रेंडची मदत

पिंपरी चिंचवडमध्ये वाल्हेकरवाडी इथे ३० तारखेला पडलेल्या दरोडा प्रकरणाला धक्कादायक वळण लागलंय. मुलीच्या प्रियकराच्या मदतीनेच नवऱ्याच्या खुनाचा कट पत्नीने रचल्याची धक्कादायक माहिती चौकशीत उघडकीस आलीय. या प्रकरणी पोलिसांनी मनिषा पाटील या ३५ वर्षीय महिले सह दोघांना अटक केली आहे.

Updated: Dec 4, 2015, 11:49 PM IST
दरोड्याला वेगळं वळण, नवऱ्याला संपवण्यासाठी मुलीच्या बॉयफ्रेंडची मदत title=

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये वाल्हेकरवाडी इथे ३० तारखेला पडलेल्या दरोडा प्रकरणाला धक्कादायक वळण लागलंय. मुलीच्या प्रियकराच्या मदतीनेच नवऱ्याच्या खुनाचा कट पत्नीने रचल्याची धक्कादायक माहिती चौकशीत उघडकीस आलीय. या प्रकरणी पोलिसांनी मनिषा पाटील या ३५ वर्षीय महिले सह दोघांना अटक केली आहे.

पिंपरी चिंचवडच्या वाल्हेकर वाडीमध्ये सोमवारी रात्री दरोडा पडल्याच्या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली. दरोडेखोरांनी मधुकर पाटील या ४५ वर्षीय इसमावर हल्ला करत १९ तोळे चोरल्याचं सांगण्यात आले. मात्र, पोलीस तपासात नवीनच धक्कादायक माहिती समोर आली.

मधुकर पाटील यांची पत्नी मनिषा पाटील हिनेच मुलीच्या प्रियकराच्या मदतीने मधुकर पाटील यांची हत्या करण्यासाठी हा बनाव रचल्याचं स्पष्ट झालंय.  पती मधुकर पाटील हे सतत मारहाण करून शारिरीक आणि मानसिक त्रास देत असंत. या मारहाणीला कंटाळून मुलीच्या प्रियकराला हाताशी धरून पतीच्या खुनाची योजना तयार केली होती. मुलीच्याही प्रेम प्रकरणाला मधुकर पाटील तयार नसल्याने तोही या  कटात सहभागी झाला. हत्येचा प्रयत्न केल्याची कबुली मनिषा पाटीलने पोलिसांना दिलीय. यासाठी मुलीचा प्रियकर निलेश भराडिया याने १ लाख रुपयांची सुपारी दिल्याचं स्पष्ट झालं.

प्रकरणाचा तपास करत असताना पाटील यांची पत्नी मनिषा हिच्या वर्तनात आणि जवाबात विसंगती आढळत असल्यामुळे पोलिसांना  संशय आला. पाटील यांच्या घरात दरोडेखोर शिरल्यानंतर मनिषा आपल्या मुलांना घेऊन घराबाहेर पळाल्या पण त्यांनी आपल्या पतीला फोन करुन ही घटना का सांगितले नाही, पती दोन दिवस रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांच्या भेटीसाठी कोणीच कसं आलं नाही याबाबत पोलिसांनी मनिषाची चौकशी केली असता तिला उत्तरं देता आली नाहीत. अखेर मनिषाने आपल्या कर्माची कबुली दिली

या प्रकरणी फिर्यादी मधुकर पाटील यांच्या पत्नी मनिषा मधुकर पाटील हिच्यासह तेजस २८ वर्षीय एकनाथ घाडगे आणि २७ वर्षीय  कुशल दीपक घाडगे या आरोपींना अटक केली आहे. मुख्य सूत्रधार नीलेश भराडियासह इतर तिघेजण अजून फरार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.