प्रताप नाईक, कोल्हापूर : संपुर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी बाजी मारलीय. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार महादेवराव महाडिक यांचा ६३ मतांनी धोबीपछाड केलाय. तब्बल तीन वेळा विधान परिषदेची निवडणूक जिंकणाऱ्या महादेवराव महाडिक यांना चमत्कार होईल असं वाटत होतं, पण तसं काही घडलंच नाही.
कोल्हापूर आणि कुस्ती हे समीकरण सर्वांनाच परिचीत आहे. हेच कुस्तीचे डावपेच कोल्हापूरच्या राजकारणात अनेक वेळा वापरले गेल्याचे दाखले आपल्याला देता येतील. त्याचंच प्रत्यंतर कोल्हापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं. काँग्रेसकडून विधान परिषदेचं तिकीट कुणाला मिळेल यासाठी मैदान रंगलं. त्यामध्ये सतेज पाटील यांनी बाजी मारली. इथेच त्यांनी अर्धी निवडणूक जिंकली होती. अपेक्षेप्रमाणं काँग्रेसचे बंडखोर उमेदवार महादेवराव महाडिक यांनी शंडू ठोकून अपक्ष म्हणून कुस्तीच्या मैदानात प्रवेश केला.
अधिक वाचा - मुंबई विधानपरिषदेच्या जागांवर कदम आणि जगताप!
कोल्हापूर जिल्हयातील मात्तबर नेते आणि पूर्वाश्रमीचे राजकारणातील कट्टर विरोधक आखाड्यात एकत्र लढणार म्हणजे लढतीत रंगत येणार हे सगळ्यानाच महित होतं. झालंही तसंच... या दोन्ही कसलेल्या उमेदवारांनी राजकारणातील आपले डावपेच आखत मतदारांची जुळवा-जुळव केली. काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांनी आपल्याला २५१ हून अधिक मतं मिळतील, असा विश्वास व्यक्त केला. तर महादेवराव महाडिक यांनी नेहमीच्या शैलीत आपणच चमत्कार घडेल आणि आपणच डाव जिंकणार असल्याचा दावा केला. पण महादेवराव महाडिक यांचा हा दावा फोल ठरला. विधान परिषदेच्या मैदानात काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी कसलेला मत्तबर अपक्ष उमेदवार महादेवराव महाडीक यांचा पट काढत घिस्सा डावावर अस्मान दाखवलं.
अधिक वाचा - धुळे - नंदूरबारमध्ये अमरीश पटेल यांची बाजी
सतेज पाटील यांनी ३८२ पैंकी २२० मतं मिळवली तर महादेवराव महाडिक यांना १५७ मतांवर समाधान मानावं लागलं. सतेज पाटील यांच्या सोबत राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ उभे होते. त्यामुळं त्यांनी तब्बल ६३ मतांनी महाडिक यांचा पराभव केला. नेहमी राजकारणातील सगळ्याच आखाड्यात काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक हे विरोधी उमेदवाराला धूळ चारत होते. पण विधान परिषदेच्या निवडणुकीत मात्र त्यांना हार पत्करावी लागली. याला कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील बदललेले डावपेच कारणीभूत ठरले असल्याचं राजकिय विश्लेषकाचं मत आहे.
काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांना विधान परिषदेचे मैदान नवीन होतं. तरीही त्यांनी विधान परिषदेचं तीन वेळा मैदान मारणाऱ्या महादेवराव महाडिक यांच्या डावपेचावर लक्ष केंद्रीत करुन त्यांना आस्मान दाखवलं. कॉग्रेसच्या सतेज पाटील यांचा हा विजय म्हणजे कोल्हापूरच्या राजकारणाची बदललेल्या समिकरणाचा भाग म्हणावा लागेल.