मालेगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपींची निर्दोष मुक्तता

8 सप्टेंबर 2006 साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी विशेष एनआयए न्यायालयानं 9 मुस्लिम आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

Updated: Apr 25, 2016, 04:31 PM IST
मालेगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपींची निर्दोष मुक्तता title=

मुंबई: 8 सप्टेंबर 2006 साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी विशेष एनआयए न्यायालयानं 9 मुस्लिम आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. यापैकी एका आरोपीचा अगोदरच मृत्यू झालाय. पुराव्याअभावी या नऊ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. 

हमिदीया मशिदीत 3 तर मुशावर चौकात 4 स्फोट झाले होते. सुरुवातीला एटीएसनं एकूण 13 आरोपींना अटक केली होती. त्यापैकी 9 जणांविरोधात मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. एटीएसनं या संशयितांना अटक केली होती. त्यांच्यावर शस्त्रास्त्रं जमवणं, बॉम्बस्फोट करणं, निर्दोष नागरिकांची हत्या करणं असे आरोप ठेवण्यात आले होते. यात एक सरकारी साक्षीदार देखील बनवण्यात आला होता. पण नंतर त्याने आपली साक्ष फिरवली आणि प्रकरणाला वेगळं वळण लागलं. 

त्याच वेळी स्वामी अससीमानंद याने केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आणि त्यांच्या जबाबावरुन एनआयए ने ४ नवीन आरोपींना अटक केली. त्यांच्या विरोधात एनआयए ने २५ मे २०१३ साली आरोपपत्र दाखल केले होते. त्यामुळे एटीएसने अटक केलेल्या आरोपींना जामिनावर सोडण्यात आलं होतं. त्यानंतर तपासावर ठपका ठेवत तो सीबीआयकडं सोपवण्यात आला.

एनआयएने केलेल्या तपासावर आणि अटक केलेल्या ४ हिंदू आरोपींच्या आधारे एटीएसने अटक केलेल्या ९ आरोपींना मुंबईतील विशेष न्यायालयात निर्दोष मुक्तता करण्याची मागणी केली होती. त्यावर गेली काही महिने युक्तीवाद सुरु होता.