चंद्रपूर : प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने येथील एका २२ वर्षीय तरुणीने 'शोले'स्टाईलने वीरूगिरी केली. तिने टोकाचे पाऊल उचलत चक्क पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येची धमकी दिली. ही घटना दुर्गापूरमधील शक्तीनगर कॉलनीमध्ये येथे घडली.
चंद्रपुरातील २२ वर्षीय युवतीचे याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध आहे. मात्र, या तरुणाने काही कारणामुळे मुलीसोबत लग्नास नकार दिला. यामुळे संतापलेल्या तरुणीने आज सकाळी प्रियकराचे घर गाठले आणि त्याला लग्न करण्याची गळ घातली. यावेळी त्यांच्यात जोरदार भांडण झाले. मुलगा लग्नास होत नसल्याचे पाहून तरुणीने प्रियकराच्या घरावर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून वीरुगिरी सुरु केली.
या तरुणीला परिसरातील अनेकांनी समजावण्याच्या प्रयत्न केला. मात्र, ही तरुणी कोणाचेही ऐकायला तयार नाही. माझे लग्न लावून दिलं नाही तर मी आत्महत्या करेन, असे या तरुणीने सांगितले. मुलाने लग्न करण्यास होकार दिल्यावरच आपण खाली उतरू, असे तिने बजावले.
हा सगळा प्रकार काय आहे, हे पाहण्यासाठी या परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली. दरम्यान, या ठिकाणी पोलीसही दाखल झालेत. ते तरुणीलाला खाली उतरविण्यासाठी प्रयत्न करत होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.