गेम डिलीट केला म्हणून केला खून

मोबाईलमधील गेम डिलीट केला म्हणून एका अल्पवयीन मुलाने एका एकोणीस वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना काल रात्री पाटणमध्ये घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Updated: Dec 24, 2014, 11:14 PM IST
गेम डिलीट केला म्हणून केला खून title=

पाटण : मोबाईलमधील गेम डिलीट केला म्हणून एका अल्पवयीन मुलाने एका एकोणीस वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना काल रात्री पाटणमध्ये घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

विशाल मारुती भिसे (वय १९, रा. निमसोड, ता. खटाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी येथील सिद्धार्थनगरातील अल्पवयीन मुलाला (वय १७) पोलिसांनी ताब्यात घेऊन सातारा येथील बाल न्यायालयात रवाना केले आहे. 

पुसेगावच्या सेवागिरी यात्रेनिमित्त प्रत्येक वर्षी पाटण येथून रथ जातो. त्या रथ यात्रेसाठी निमसोड (ता. खटाव) येथील विशाल येथे येतो. त्याचे पाटण हे आजोळ आहे. यंदाही तो मामा काकासाहेब महिपती चव्हाण (रा. इंदिरानगर, पाटण) यांच्याकडे आला होता. सेवागिरी महाराजांच्या रथ यात्रेत पाटण येथील अनेक भाविक सहभागी होतात. त्यामध्ये विशालला मारणारा संबंधित अल्पवयीन मुलगाही रथाबरोबर पुसेगावला गेला होता. यात्रेत विशालने संबंधित मुलाच्या मोबाईलमधील गेमचे ऍप्लिकेशन डिलीट केले. त्यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. पाटणला परत गेल्यानंतर तुला बघतो, अशी धमकी संबंधित मुलाने विशाल याला दिली होती, असे पोलिसांनी सांगितले.

पुसेगावची यात्रा संपवून विशाल सोमवारी पाटणमध्ये आला. त्याच रात्री शहरातून मेनरोडमार्गे तहसील कार्यालयाकडे जात असताना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पुन्हा विशाल आणि त्या संबंधित मुलामध्ये वाद झाला. संबंधित अल्पवयीन मुलाने विशाल याच्यावर आपल्याकडील चाकूने वार केला. तो वर्मी लागल्याने विशाल जागीच कोसळला. त्याला ग्रामस्थांनी त्वरित ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर विशालला कऱ्हाड येथील कृष्णा रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना मध्यरात्री दोनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. आज सकाळी शवविच्छेदनानंतर विशालचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. 

पोलिसांनी आज सकाळी संशयितास ताब्यात घेतले व सातारा येथील बाल न्यायालयात त्याची रवानगी केली. विशालचे मामा काकासाहेब चव्हाण यांनी पोलिसांत फिर्याद दिली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.