विशाल करोळे, औरंगाबाद : मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडलाय. त्यात येणा-या काळात पाणी आणि चा-याची भीषण टंचाई भेडसावणारेय. मात्र यावरच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या औरंगाबाद कृषी विज्ञान शाखेनं तोडगा काढलाय.... या तोडग्याद्वारे भर उन्हाळ्यातही अत्यल्प पाण्यात हिरवा चा-याची सोय घरच्याघरी करता येणारेय. पाहूयात झी मीडियाचा स्पेशल रिपोर्ट...
दोन किलो धान्य... पाच लिटर पाणी... आणि बारा दिवसांत कुठल्याही ऋतूत 10 किलो हिरवा चारा तयार... ही किमया साधलीय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या औरंगाबाद कृषी विज्ञान शाखेनं... दुष्काळाला सातत्यानं तोंड देणा-या मराठवाड्यातल्या शेतक-यांसाठी औरंगाबादेत मातीविना शेतीचा प्रयोग हाती घेण्यात आलाय. या माध्यमातून 10 ते 15 दिवसांत जनावरांसाठी चारा उपलब्ध होऊ शकेल. कमी पाण्यात आणि मातीशिवाय पिके वाढविण्याच्या हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाची या ठिकाणी चाचणी सुरुय. बियाणास आर्द्रता, पाणी, अन्नद्रव्यं देऊन मातीशिवाय वाढ केली जाते. यासाठी मका, गहू, बार्ली या तृणधान्याचा वापर केला जातो. पाहूयात नेमका हा प्रयोग कसा करता येणारेय.
सर्वात आधी तृणधान्य मोड आणण्यासाठी बारा तास पाण्यात भिजत ठेवलं जातं. त्यानंतर पाणी काढून ते धान्य गोणीत 24 ते 36 तास दाबून ठेवलं जातं. या कालावधीत मोड येण्यास सुरवात होते. मोड आलेलं बियाणं एका प्लास्टिक ट्रेमध्ये पसरवून लाकडी मांडणीवर ठेवलं जातं. त्यावर दर दोन तासांनी पाणी फवारण्यात येतं. पीकवाढीसाठी आवश्यक आर्द्रता, ओलावा ठेवला जातो. प्लास्टिक रॅकमध्ये 8 ते 10 दिवसांत 20 ते 30 सेंटीमीटर उंचीचं हिरवं पीक तयार होतं. हे तयार झालेलं पीक जनावरांना मुळासकट खाऊ घालता येतं.
एक किलो धान्यापासून 5 ते 6 किलो हिरवा चारा उपलब्ध होतो. तसंच या चा-यात धान्याच्या तुलनेत दोन ते अडीचपट अधिक प्रथिनं तसंच इतर पौष्टिक घटक असतात.
दुष्काळात तर हा प्रयोग शेतक-यांसाठी आणि जनावरांसाठी संजीवनी सुद्धा ठरू शकतो.
हा प्रयोग पाहून तर काही शेतक-यांनी तातडीनं तो राबवण्याचा निर्धारही व्यक्त केलाय.
सध्या हा प्रयोग केवळ चा-यापुरता मर्यादित असला तरी यापुढं शेतीची काही उत्पादनं आणि भाजीपालाही या पद्धतीनं पिकवता येईल का याचाही अभ्यास सुरुय. त्यामुळं हा प्रयोग दुष्काळातल्या शेतक-यांसाठी नक्कीच आशेचा किरण ठरणारेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.