डोंबिवली : डोंबिवलीत एका महिला बोगस डॉक्टरला अटक करण्यात क्राईम ब्रान्चला यश आलंय. महत्त्वाचं म्हणजे, अशाच गुन्ह्याप्रकरणी या महिलेवर 2014 सालीही कारवाई करण्यात आली होती.
एका बारावी शिकलेल्या महिलेनं इंडियन मेडिकल काऊन्सिलची महाराष्ट्रात वैद्यकीय व्यवसाय करण्याची कोणतीही अधिकृत परवानगी नसताना हॉस्पिटल थाटल्याची खबर क्राईम ब्रान्चला मिळाली होती. इथं गरीब, गरजू आणि सामान्यांवर उपचार चुकीच्या पद्धतीनं उपचार करून पैसे कमावण्याचा धंदा सुरू होता.
त्यानुसार पथकानं शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मानपाडा गावातील उंबार्ली रोडला असलेल्या आई आशिर्वाद इमारतीत घुसून तेथील 'साईबाबा नर्सिंग होम' या हॉस्पिटलवर अचानक छापा टाकला... आणि अनिता एस. उर्फ अनिता सावंत उर्फ अनिता लोंढे उर्फ अनिता मोहम्मद साहिल काश्मिरी या 50 वर्षीय महिलेला ताब्यात घेतले.
या महिलेकडे अॅलोपॅथिक व्यवसायाशी निगडित औषधे सापडली. तसेच तिच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी अधिकृत प्रमाणपत्र नसल्याचे आढळून आले. मात्र तरीही ही महिला नर्सिंग होममध्ये अॅलोपॅथिशी निगडित औषधांचा वापर करून आपण अधिकृत वैद्यकिय व्यवसायिक असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करत होती. या महिलेविरोधात गुन्हा दाखल करत तिला पोलिसांनी अटक केलीय.
या पथकात सहाय्यक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे, फौजदार बाजीराव बरकले, दत्ताराम भोसले, राजेंद्र खिलारे, अजित राजपूत, संजय पाटील, चित्रा इरपाचे, नितीन म्हात्रे, विजय पाटील, एस. एस. दळवी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश कदम, प्रशांत गवाणकर आणि कमलेश सोनावणे यांचा समावेश होता.
उल्लेखनीय म्हणजे, या महिलेवर झालेली ही दुसरी कारवाई आहे. २०१४ साली देखील या महिला बोगस डॉक्टरवर मुंबईत कारवाई करण्यात आली होती. तेव्हाही ही महिलेला दोन महिने तुरुंगात होती. पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर या बोगस महिला डॉक्टरला जामीन मिळाला होता.
तरीही यातून धडा न घेता या बोगस डॉक्टर महिलेने जामिनावर बाहेर येताच एका वर्षांच्या आतच डोंबिवलीमध्ये पुन्हा बोगस दवाखाना उभारत लोकांना ठकण्याचं काम सुरू केलं.
ठाणे क्राईम ब्रान्चचे एसीपी मुकुंद हातोटे यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी रितसर ही महिला बोगस डॉक्टरची सर्व माहिती काढली आणि संबंधित अधिकाऱ्यांसह छापा टाकून बोगस महिला डॉक्टरला अटक केली. सोमवारपर्यंत न्यायालयाने या बोगस महिला डॉक्टरची पोलीस कोठडीत रवानगी केलीय.