धुळे : व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियाचा समाजकारणासाठी कसा वापर करता येईल याचं उदाहरण धुळ्यात समोर आलंय.
धुळे शहरातल्या मालेगाव रोडवर असलेल्या जिनिअस स्पेअर शॉपवर दिवसभर मोठी गर्दी असते. कारण या शॉपचे मालक कल्पेश शर्मा यांनी एक अनोखी चळवळ सुरू केलीय. व्हॉट्स ऍपवर रक्तदात्यांचे ग्रुप त्यांनी बनवलेत. गरजू व्यक्तीला त्यांच्यामुळे तात्काळ रक्त उपलब्ध होऊ शकतं.
कल्पेश शर्मा यांच्या कुटुंबात रक्तदानाची चळवळ गेल्या 15 वर्षांपासून सुरूय. कुठलाही गाजावाजा न करता त्यांचं हे समाजकार्य सुरूय. रक्तदानाच्या या चळवळीची प्रेरणा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाली. त्यांच्या श्रीदीप रक्त सेवा ग्रुपवर तब्बल चौदाशे जण जोडले गेलेत.
व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सर्व जातीपातीच्या भिंती गळून पडल्यायत. रक्तदानाची ही व्हॉट्स ऍप चळवळ आता तळागाळापर्यंत पोहोचलीय. कुठलेही दुर्मिळ रक्तगट याठिकाणी उपलब्ध होतायत.
गेल्या चार महिन्यात तब्बल 90 रुग्णांना ऐनवेळी या ग्रुपच्या माध्यमातून रक्त पुरविण्यात आलंय. 24 तास ही सेवा उपलब्ध असते. अडचणीच्या काळात ज्याला रक्त मिळतं तो या ग्रुपला आपोआप जोडला जातो.
अनेकांकडून सोशल मीडियाचा सामाजिक स्वास्थ बिघडवण्यासाठी वापर केला जात असताना धुळ्यात मात्र याच माध्यमाचा वापर आदर्श निर्माण करणार आहे.
श्रीदीप रक्त सेवा ग्रुपची ही चळवळ अशीच सुरु राहो आणि या उपक्रमांतून समाज माध्यमांचा समाज जोडण्यासाठी वापर करण्याची सुबुद्धी समाजकंटकांना मिळो एवढीच अपेक्षा.