औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या रणसंग्रामाची बातमी. निवडणुकांच्या तोंडावर आता भाजपमध्येही नाराजी नाट्य सुरू झालंय. औरंगाबाद महापालिका निवडणुकांसाठी भाजपची एकीकडे जय्यत तयारी सुरू असताना दुसरीकडे नाराजांचीही मोठी फौज भाजपमध्ये निर्माण होऊ लागलीय. या नाराजांच्या फौजेचं नेतृत्व खुद्द पंकजा मुंडेच करत असल्याची माहिती मिळतेय.
गुरुवारी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र त्या कार्यक्रमाला आल्याच नाही. त्यामुळे स्थानिक आयोजकांची धावपळ झाली.
अखेर जालन्यात खासगी कामासाठी आलेल्या बबनराव लोणीकर यांना स्थानिक नेत्यांनी गळ घातली आणि कसातरी त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. मात्र पंकजा मुंडेंच्या ऐनवेळीच्या दांडीनं चर्चांना उधाण आलंय.
दरम्यान, महापालिका निवडणुकांत मुंडे समर्थकांना डावलण्यात येतंय, असा आरोप होतोय तर दानवे समर्थकांना जास्त तिकीट मिळणार, असे चित्र निर्माण झालय. मुंडे समर्थकांनी याची तक्रार पंकजा मुंडे यांच्याकडं केली मात्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यसोबत बोलूनही तोडगा न निघाल्यानं पंकजा ताई नाराज झाल्या आणि कार्यक्रमाला दांडी मारली, असे बोलले जात आहे.
काही प्रभागावरून खास हे भांडण पेटलंय. दानवेंची ज्या प्रभागावर नजर आहे. त्याच वॉर्ड्सचं पंकजा मुंडेंच्या समर्थकांना तिकीट हवंय. दानवेंनी आधीच या प्रभागाचं जणू वाटपच केलंय. त्यामुळं कार्यकर्त्यांच्या नाराजीत भर पडलीये. भाजपचे अनेक नेते खाजगीत असा वाद असल्याचं मान्य करतात, पण माध्यमांसोबत बोलताना कुठलाच वाद नाही असा सांगण्याचा प्रयत्न करताय.
मात्र गटबाजीतून वाद उफाळून आलाच तर त्यात भाजपलाच नुकसान सहन करावं लागेल. त्यामुळे रावसाहेब दानवे त्यांच्या आणि मुंडे समर्थकांचं कसं समाधान करतात यावर बरंच काही अवलंबून असणार आहे, अशी चर्चा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.