पुण्यातील कसबा - सोमवार पेठेत चुरशीची लढत

महापालिका निवडणुकीत काही चुरशीच्या लढती होत आहेत. त्यातील सर्वाधिक चुरशीची लढत म्हणून कसबा - सोमवार पेठेतील लढतीकडं बघितलं जातंय. याठिकाणी भाजपचे गणेश बिडकर विरुद्ध - काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात सामना रंगणार आहे.

Updated: Feb 15, 2017, 04:23 PM IST
पुण्यातील कसबा - सोमवार पेठेत चुरशीची लढत title=

पुणे : महापालिका निवडणुकीत काही चुरशीच्या लढती होत आहेत. त्यातील सर्वाधिक चुरशीची लढत म्हणून कसबा - सोमवार पेठेतील लढतीकडं बघितलं जातंय. याठिकाणी भाजपचे गणेश बिडकर विरुद्ध - काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात सामना रंगणार आहे.

काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे गणेश बिडकर. पुण्यातील सर्वाधिक चुरशीची म्हणता येईल अशी ही लढत. महापालिकेची धंगेकर यांची ही चौथी लढत. आतापर्यंत तीन वेळा धंगेकर यशस्वी झालेत. पण, चौथी लढत त्यांच्यासाठी  अस्तित्वाची लढाई आहे. चार उमेदवारांच्या प्रभाग रचनेत धंगेकरांचा प्रभाग बदलला. त्यानंतर धंगेकर यांनी स्वतः पक्ष देखील बदलला. मनसे ते काँग्रेस व्हाया भाजप असा प्रवास त्यांनी महिनाभरात केला. धंगेकर काँग्रेसचे उमेदवार असले तरी त्यांच्याकडे पंजा हे चिन्ह नाही. कारण, एबी फॉर्मच्या गोंधळात त्यांचा काँग्रेसचा फॉर्म बाद झाला. त्यामुळं ते आता काँग्रेस पुरस्कृत म्हणून रिंगणात आहेत.

गणेश बिडकर यांच्याही महापालिकेत तीन टर्म झाल्या आहेत... बदललेल्या रचनेत बिडकर यांच्या जुन्या प्रभागाचा बराचसा भाग आलेला आहे. भाजपचं गटनेते पद, राज्यातील आणि केंद्रातील भाजपची सत्ता, पंधरा वर्षात प्रभागात केलेली कामं आणि जनसंपर्क या बिडकरांच्या जमेच्या बाजू आहेत.  त्यामुळंच सुरवातीला तर, बिडकर यांच्या विरोधात सक्षम उमेदवारही विरोधकांना सापडत नव्हता. पण धंगेकरांच्या एंट्रीनं चित्र पालटलं आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आली तर, बिडकर यांना निश्चित मोठा रोल मिळेल. पण त्यासाठी त्यांना, धंगेकर यांचं आव्हान परतवून लावावं लागणार आहे. 

महापालिकेत २००७ ते २०१२ अशी सलग पाच वर्षे धंगेकर मनसेचे गटनेते होते. स्मार्ट सिटीसाठी स्थापन करण्यात आलेल्या कंपनीचे ते संचालकही आहेत. विधानसभेच्या  २००९ च्या निवडणुकीत त्यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांना कडवी झुंज दिली होती. अवघ्या सात हजार मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला होता. बिडकर यांनी अद्याप विधानसभा लढवली नसली तरी, ते स्थायी समितीचे अध्यक्ष होते. भाजपचे गटनेते आहेत आणि भाजपचे शहरातील महत्वाचे नेते देखील आहेत. त्यामुळंच या दोघांच्या लढतीकडं पुण्याचं लक्ष लागलं आहे.