लोणावळा : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्याजवळीत विसापूर किल्ल्यावर जमलेल्या पर्यटकांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. दुर्गप्रेमी दुर्गसंवर्धक असल्याचं सांगत या तरुण तरुणींनी पर्यटकांना बेदम मारहाण केली.
मारहाण करणा-या 13 जणांविरोधात मारहाण, विनयभंग आणि दंगल माजविणे या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पुण्यातील एका महिला पर्यटकाने तक्रार केली आहे. ही महिला पतीबरोबर नववर्ष स्वागतासाठी मळवली इथल्या विसापूर किल्ल्यावर गेली होती. त्याठिकाणी इतरही पर्यटक होते, काही वेळात तिथे युवक युवतींचा मोठा जमाव आला आणि किल्ल्याचा परिसर घाण केल्याच्या कारणावरून वाद घालण्यास सुरुवात केली.
अश्लील शब्द वापरून पुरुषांना अंगावरील शर्ट आणि बनियन काढून कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. या मारहाणीत या महिला पर्यटकाच्या हाताला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाला तर मुंबईतील एक पर्यटक प्रतीक गुप्ता हेही गंभीर जखमी झाले. लोणावळा पोलिसांनी आत्तापर्यंत दोन तरुणींसह सात तरुणांना अटक केली आहे.