बंटी आणि बबलीने घातला अनेकांना गंडा

औरंगाबादमध्ये बंटी आणि बबलीनं मेणबत्ती तयार करण्याच्या गृहउद्योगाच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचं उघड झालंय. गृह उद्योगाच्या नावानं बंटी-बंबलीनं 400 महिलांची फसवणूक केली. आणि सगळे पैसै घेऊन पसार झाले. 

Updated: Nov 23, 2016, 06:22 PM IST
 बंटी आणि बबलीने घातला अनेकांना गंडा  title=

विशाल करोळे, झी मीडिया, मुंबई : औरंगाबादमध्ये बंटी आणि बबलीनं मेणबत्ती तयार करण्याच्या गृहउद्योगाच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचं उघड झालंय. गृह उद्योगाच्या नावानं बंटी-बंबलीनं 400 महिलांची फसवणूक केली. आणि सगळे पैसै घेऊन पसार झाले. 

हे प्रकरण प्रथमदर्शनी मोठ्या फसवणुकीचं असल्यानं औरंगाबाद पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे प्रकरण सोपवलंय. 

चित्रपटातील बंटी आणि बबली नागरिकांना कसा गंडा घालतात हे आपण पाहिलंच आहे. मात्र, याच बंटी-बबलीप्रमाणे औरंगाबादमध्येही एका दाम्पत्यानं जवळपास 400 महिला-पुरुषांना गंडा घालत पोबारा केला. मूळचे नागपूरचे असणारे प्रशिक बनसोड आणि नेहा बनसोड या दाम्पत्यानं ग्लोबल गृहउद्योगाच्या नावाखाली कंपनी सुरु केली. त्याची जाहीरात अल्प भांडवलात मेणबत्ती तयार करण्याचा गृहउद्योग सुरु करा अशी केली. 

मेणबत्ती तयार करण्यासाठीचा कच्चा माल कंपनी पुरवणार आणि मेणबत्तीही विकत घेणार. आणि प्रति मेणबत्ती 5 रुपये देणार असल्याचं नागरिकांना सांगितलं. मात्र, 10 दिवसांपूर्वी अचानक हे दाम्पत्य गायब झालं आणि पैसै गुंतवणूकदार घाबरले. कुठलाही ठावठिकाणा न लागल्यानं अखेर पीडितांनी पोलिसांकडे धाव घेतली.

आतापर्यंतच्या तपासात एक कोटींची फसवणूक समोर आलीय. पोलिसांनी या कंपनीचं भाड्याचं कार्यालय सील केलंय. तर कार्यालयातील सर्व सामान जप्त करण्यात आलंय. 

याआधी बनसोड दाम्पत्यानं नागपूरमध्येही अशाच पद्धतीनं नागरिकांची फसवणूक केल्याचं उघड झालंय. पोलिसांनी बनसोड दाम्पत्याची बँक खातीही सिल केली आहेत. त्यातही 10 लाख रुपये असल्याची माहिती आहे. आता हे प्रकरण समोर आल्यानं पोलीस ठाण्यात तक्रारी देण्यासाठी ओघ वाढत चाललाय. त्यामुळे या बंटी-बबलीनं हजाराहून अधिक नागरिकांना फसवल्याचा अंदाज आहे.